जलचरांनी बहरले बावखल, राकेश रिबेलो या तरूणाचे अथक परिश्रम आले फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 01:09 AM2018-08-16T01:09:02+5:302018-08-16T01:09:18+5:30

वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे.

Rakesh Rebello news | जलचरांनी बहरले बावखल, राकेश रिबेलो या तरूणाचे अथक परिश्रम आले फळाला

जलचरांनी बहरले बावखल, राकेश रिबेलो या तरूणाचे अथक परिश्रम आले फळाला

Next

नालासोपारा - वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्या नष्ट होत असताना वसईतील एका तरूणाने गावातील कचरा व मातीने गाडलेली बावखल पुन्हा जिवंत करून दाखवले आहे. राकेश रिबेलो असे या तरूणाचे नाव असून त्याने एकट्याने बुजलेलीे बावखल पुन्हा जीवंत केले. ती मध्ये गोड्या पाण्याचे झरे आढळल्याने बावखल पाण्याने भरून गेले आहेत. त्यात कासव, मासे आदींची सद्या रेलचेल पहायला मिळत आहे.
वसईतील पश्चिम पट्यात वाडी, शेतीसाठी व इतर कामांसाठी याच बावखलाचा वापर होतो. बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी बावखले महत्वाचे काम करतात. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकांचा बेपर्वा वृत्तीमुळे बावखळे नष्ट होऊ लागली आहेत. परिणामी पर्यावरणाचा समतोलही बिघडू लागला आहे. वसईतील पुर्वी ५०० हून अधिक असणाऱ्या बावखलांची संख्या ३०० पेक्षा कमी झाली असून जी आहेत त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे.
रमेदी गावातील खोपवाडी येथे जूने बावखल होते. त्यात रहाट लावून ग्रामस्थ पाणी भरत असत. तसेच, या मुळे परिसरातील कुपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असायची. त्या भोवती हिरवी झाडी असल्याने विविध पक्षी येत असत. मात्र, काहींनी मातीचा भराव आणि कचरा टाकून बावखल बुजवून टाकले होते.
बोटीवरून गावात परतलेल्या राकेश ने या बावखलाचे महत्व ओळखून ते पुन्हा तयार करण्याचे ठरवले. ग्रामस्थांची परवानगी घेतली मात्र, कुणी प्रत्यक्ष मदतीला आले नाही. त्यामुळे त्याने काही दिवस काम करून कचरा काढून बावखल स्वच्छ केला. त्यानंतर जेसीबी आणून मातीचा भराव काढला. या बावखलाच्या खाली गोड पाण्याचे झरे लागले. काही दिवसात ते बावखल स्वच्छ पाण्याने भरुन गेले आहे. या बावखलात रहाटासाठी लागणारा खुंट, चर्चचा एक क्र ॉस आढळला. या प्रयत्नामुळे तेथे विविध जातीचे मासे आणि कासवे आले आहेत. गावातील तरु ण मासेमारीचा आनंद घेण्यासाठी या बावखलात आता येत असतात.
बावखल पुन्हा तयार झाल्याने खोपवाडीची शोभा पुन्हा पुर्ववत झाली आहे. हे गावाचे वैभव असल्याचे गावकरी सांगतात. कुणावर अवलंबून रहाण्यापेक्षा मी स्वत: हे काम केले आणि एक बावखळ वाचवू शकलो याचा मला आनंद आहे असे राकेशने सांगितले. वसईत बावखले वाचिवण्याची मोहीम सुरू आहे. अशा वेळी राकेशने जिवंत करून दाखवलेले बावखल या मोहीमेसाठी स्फूर्तीदायी ठरू शकणार आहे.

बावखल म्हणजे काय?
पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो. त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखले असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर होय. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गाड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठी देखील याचा वर्षभर वापर केला जात असे.

उत्तर कोकणातील काही भागात आजही याचा वापर होतो. बावखलामुळे जमिनीत ओलसरपणा राहतो. त्यामुळे, आजू-बाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.’’ बावखलाच्या पाण्यात आजू-बाजूला झाडे-झुडपे फुलत असत. पूर्वी मुले बावखलात पोहोण्यासाठी देखील जात असत. बावखले ही वसईच्या पारंपारिक संस्कृतीची ओळख आहे. बावखलाजवळील गर्द हिरव्या झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाई.

Web Title: Rakesh Rebello news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.