बलात्कार करणाऱ्या 38 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:29 AM2022-05-26T10:29:40+5:302022-05-26T10:30:26+5:30
वसई न्यायालयाने दिला निर्णय
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या ३८ वर्षीय नराधम आरोपीला वसई न्यायालयाने आजन्म कारावास आणि १० हजारांचा दंड अशी शिक्षा मंगळवारी सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात ४ ऑक्टोबर २०१८ रोजी १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार प्रकरणी आरोपी सभापती बिंद (३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चाईल्ड असोसिएशनच्या सदस्याच्या तक्रारीवरून बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी आरोपीला अटक केली होती. मंगळवारी याप्रकरणी सुनावणी दरम्यान पोलिसांनी सादर केलेले साक्षीपुरावे, वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल, आरोपी व प्रतिपक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद आदी बाबी पडताळल्यानंतर वसई जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश ए. यू. कदम यांनी शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास
दंड न भरल्यास आरोपीला सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. केसमध्ये सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी युक्तिवाद करून आरोपीला शिक्षा व पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एल.एस. घाणे आणि कोर्ट कर्मचारी म्हणून पोलीस अंमलदार वाय.बी. भेस्कर यांनी कामकाज पाहिले.