वसईच्या रानगाव समुद्रकिनारी मृत अवस्थेत आढळून आला दुर्मिळ मासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:54 PM2022-02-05T19:54:06+5:302022-02-05T19:55:25+5:30
भारतीय व प्रशांत महासागरा सोबत चीनच्या यांगजी नदीत आढळून येणारा फिनलेस पोरपोईज (finless porpoise) या दुर्मिळ प्रजाती वसईच्या समुद्रकिनारी प्रथमच !
आशिष राणे
भारतीय व प्रशांत महासागरासोबत चीनच्या यांगजी नदीतील गोड्या पाण्यात आढळून येणारा फिनलेस पोरपोईज ( finless porpoise ) या प्रजातीचा असलेला हा दुर्मिळ मासा चक्क कोकण किनारपट्टीवरील वसईच्या रानगाव समुद्रकिनारी मृत अवस्थेत आढळून आला आहे. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास रानगाव गावांतील स्थानिक नागरिक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना हा मासा मृत अवस्थेत दिसून आल्याचे ग्रामस्थ श्रीरंग यांनी लोकमतला सांगितले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या माशाची लांबी जवळपास ३ फुट असून त्याचं नाव फिनलेस पोरपोईज (finless porpoise) असे आहे. दरम्यान, समुद्राच्या भरतीच्या लाटेसोबत हा दुर्मिळ मासा समुद्रकिनारी आला असावा आणि त्याची पाहणी केली असता त्यावेळी या फिनलेस पोरपोईज माशाच्या शेपटीला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचे आढळून आले.
किंबहुना भर समुद्रातील जहाजाचा जोरदार फटका या माशाला लागल्यामुळे या दुर्मिळ माशाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. अर्थात हा मासा दुर्मिळ असल्याने स्थानिकांनी संबंधित बाब मत्स्य विभाग व वसई विरार अग्निशमन दलाला कळवली असून मृत झालेला मासा समुद्रातील लाटेमुळे किनाऱ्यावर लागला होता. या दुर्मिळ असलेल्या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी रानगाव समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.
पोरपोईज ही प्रजाती आहे
वसईत आढळून आलेला हा दुर्मिळ जातीचा मासा ही एक नियोफोकेना पोरपोईज परिवारामधील प्रजाती असून यात तीन प्रकरांचे पोरपोईज आहेत. इंडो पैसिफिक ,पूर्व एशियाई आणि यांगजी फिलनेस तिघामध्ये थोडं थोडं वेगळंपण आहे.