दुर्मीळ मासा वाचविल्यास २५ हजार , राज्य शासनाची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:35 AM2018-12-28T02:35:32+5:302018-12-28T02:35:46+5:30
बेसुमार व अनियंत्रित मासेमारी मुळे डॉल्फिन, शार्क यासारख्या अनेक दुर्मिळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून ह्या प्रजातीच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे.
- हितेन नाईक
पालघर : बेसुमार व अनियंत्रित मासेमारी मुळे डॉल्फिन, शार्क यासारख्या अनेक दुर्मिळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून ह्या प्रजातीच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे. हे दुर्मिळ मासे जाळ्यात सापडल्या नंतर त्याची सुखरूप सुटका करतांना मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाल्यास तिच्या भरपाईपोटी त्यांना २५ हजार रु पये मिळणार आहे.
बॉटम ट्रॉलिंग, पर्ससीन नेट, एलईडी या विनाशकारी पद्धतीने होणारी मासेमारी, आणि मासेमारी नौकांची वाढती संख्या आदी कारणाने सध्या मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असून मच्छीच्या घटत्या उत्पादना नंतर अधिकाधिक मासे पकडण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. अशा ह्या बेसुमार पद्धतीने दिवसरात्र सुरू असलेल्या मासेमारी मुळे आणि अंडीधारी मच्छीच्या व लहान पिल्लांच्या होणाº्या मच्छीमारीमुळे तांब, अडविल, बाकस, राख, घोडा मासा आदी शेकडो मच्छीच्या जाती दुर्मिळ झाल्या आहेत.
समुद्रात कासव(कहाय) डॉल्फिन, शार्क आणि इतर दुर्मिळ प्रजातींना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये संरक्षित करण्यात आले आहे. मासेमारी करताना अनेकदा अशा प्रजातींचे मासे व कासव जाळ्यांमध्ये अडकल्यावर त्यांना सुखरूपपणे सागरात सोडवितांना अनेक वेळा मच्छिमार्यांच्या जाळ्याचे नुकसान होते. मच्छीमार समाज हा देवभोळा असल्याने तो व्हेल, कासव यांना देवाचे रूप मानीत असून डॉल्फिन माशाची मासेमारी करीत नाही. चुकून हे मासे जाळ्यात आल्या नंतर आपले नुकसान सोसून हे मच्छीमार त्यांची सुखरूप सुटका करीत असल्याचे नुकतेच वडराई येथील मच्छीमारांनी एका व्हेल माशाची सुटका करून दाखवून दिले होते.
३५-४० वर्षांपूर्वी शार्क माशांची खूप धोकादायक समजली जाणारी मासेमारी समुद्रात १०० वाव खोलवर काही मिच्छमार करीत होते. मात्र काही शार्क च्या मासेमारीवर बंदी आल्यानंतर ही मासेमारी बंद करण्यात आली. समुद्रात टाकण्यात आलेल्या जाळ्यात संरक्षित मासे सापडल्यास नुकसान सोसून त्या माशांची सुटका मच्छीमार आज पर्यंत विना मोबदला करीत समुद्रातील जैवविविधतेचा समतोल राखण्याचे काम करीत आला आहे. शासनाने दुर्मिळ ठरलेल्या प्रजातीचे संरक्षण व्हावे, आणि त्यांची सुटका करतांना मासेमारी जाळे फाटल्याने किंवा कापल्याने मच्छीमार बांधवांचे होणारे नुकसान ही टाळता यावे या उद्देशाने त्यांना २५ हजार रु पयांचे अनुदान मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग यांच्या कांदळवन कक्षामार्फत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येणार आहे. समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छीमारांमध्ये जनजागृती करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभाग आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा ही आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी झाला आहे.
या अनुदानासाठी असा करावा अर्ज!
या योजनेनुसार मिळणारे नुकसानभरपाई अनुदान मागतांना मच्छीमारांनी नौका मालकाचे नाव, पूर्ण पत्त्यासह अनुदानाचा अर्ज, नौकेचे नाव व क्र मांक, मासेमारी परवाना, नौका नोंदणी प्रमाणपत्र, नौकेवर उपस्थित सर्व सदस्यांची नावे आणि आवश्यक कागदपत्रे, ज्या ठिकाणी दुर्मिळ प्रजाती सापडल्या आहेत त्या ठिकाणचे जीपीएस क्र मांक, जाळी फाडताना व दुर्मिळ प्रजातींची सुटका करतानाचे छायाचित्र व चित्रफीत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्याच्या सत्यतेची छाननी झाल्यानंतर हे अनुदान संबंधित मच्छीमाराला देण्यात येईल.
देवमासा व डॉल्फिन ह्यांना आम्ही देवतुल्य मानतो. घोडमाशा सारख्या अनेक दुर्मिळ प्रजाती जाळयात आल्यास आम्ही नुकसान सोसून नेहमीच त्याला समुद्रात सुखरूप सोडत आलो आहोत.
- हृषीकेश मेहेर, मच्छिमार