उन्हामुळे भातपीक धोक्यात : दुबार भात पेरणीचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:49 PM2019-06-25T23:49:45+5:302019-06-25T23:50:06+5:30
पाऊस रुसल्याने वसईतील बळीराजा संकटात सापडला आहे. कडक उन्हात भात रोपांना पाणी न मिळाल्याने ती करपण्याची स्थितीत असून आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट बळीराजा पुढे उभे राहणार आहे.
पारोळ - पाऊस रुसल्याने वसईतील बळीराजा संकटात सापडला आहे. कडक उन्हात भात रोपांना पाणी न मिळाल्याने ती करपण्याची स्थितीत असून आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट बळीराजा पुढे उभे राहणार आहे.
रोहिणी मृग नक्षत्र, संपले तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्व मोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भात रोपांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकामधील रोपे करपण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
वसईत पेरणी झालेल्या सर्व भागात ही समस्या उद्भवली आहे. या जमिनीत उगवण झालेल्या नर्सरी रोपांची अवस्था पाण्याअभावी गंभीर बनली आहे. सततच्या पावसात रोपे टिकाव धरतात, असे असताना मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला तीन-चार दिवस पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. तापलेल्या जमिनीत पावसाच्या सरींचा शिडकाव होताच ही रोपे उगवतात. मात्र, त्यानंतरही पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागतो आहे. सध्या अधूनमधून एखादी सर पडते, तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस सुरू न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.