कोकणात गणपतीसाठी जाण्याचे दर गगनाला भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 02:28 AM2020-08-04T02:28:52+5:302020-08-04T02:29:41+5:30
रेल्वे, एस.टी. बंद : प्रतिव्यक्ती दोन-अडीच हजार रुपये, चाकरमानी त्रस्त
नालासोपारा : वसई-विरारमधील हजारोच्या संख्येने कोकणातील चाकरमानी राहतात. हे चाकरमानी आराध्य दैवत असलेल्या गणपती उत्सवासाठी कोकणात जातात, मात्र या वेळी कोरोनाचे मोठे संकट असल्याने लॉकडाऊनमुळे ट्रेन, एस.टी. बंद आहेत. या फायदा ट्रॅव्हल्सवाल्यांनी उठवला असून तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत. एका व्यक्तीकडून दोन ते अडीच हजार रुपये तिकिटांसाठी आकारले जात असल्यामुळे चाकरमानी त्रस्त झाले आहेत.
मुंबई आणि उपनगरांतील शहरांतून दरवर्षी लाखो प्रवासी गणपती उत्सवासाठी कोकणात जातात. पण, या वर्षी त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागणार आहे. खाजगी बससेवा चालवणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी सणासुदीच्या काळात आपले दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांच्या भाडे आकारणीवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट सुरू आहे. ज्यांचे स्वत:चे वाहन असेल तर ई-पास काढण्याची अट राज्य सरकारने घातलेली आहे, तर ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने नाहीत, त्यांना खाजगी ट्रॅव्हल्समधून गाव गाठून गणपती उत्सव साजरा करायचा आहे. या होणाºया गर्दीमुळे चाकरमान्यांचे हाल होत असून काहींना तिकीट सुद्धा मिळत नसल्याने गावाला जाण्यास मुकावे लागणार आहे. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट गाड्या प्रवाशांची लूट करत आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या सणात मुंबई आणि उपनगरातील शहरातून रहिवासी उत्सवासाठी आपल्या गावी जातातच. पण सध्या कोरोना वातावणामुळे शासनाने लावलेल्या अटी-शर्तीने ही संख्या घटली असली तरी अजूनही काही लोक गावी जात आहेत. पण त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडले असता केवळ प्रवासासाठी एका प्रवाशाला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. आधी हेच भाडे केवळ पाचशे ते सातशे रु पये होते. पण आता दर ट्रॅव्हल्सवाल्यांनी दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ट्रॅव्हल्सवाले कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीमुळे व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे कारण सांगत भाडेवाढ केल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि शासकीय बससेवा नसल्याने नागरिकांना खाजगी बससेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. इतकेच नाही तर येथून गावी गेल्यावर त्यांना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागणार आहे. वाढलेले प्रवास दर सामान्यांना परवडत नसतानाही त्यांना नाइलाजाने पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे शासनाने शासकीय प्रवास सेवा गणपतीसाठी निदान सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
ई-पासेस आॅनलाइन मिळणार सांगितले जाते, पण ते अद्याप मिळत नाहीत. कागदपत्रांची पूर्तता करूनही वेटिंग म्हणून मेसेज येत आहे. अव्वाच्या सव्वा पैसे दिले की, हेच ई-पासेस एजंट लोकांना कसे काय मिळतात?
- सचिन निवळकर, संतप्त प्रवासी
कोरोनामुळे तीन महिन्यांपासून कामावर नाही आणि गावी जाण्यासाठी ट्रेन किंवा बसेसची सुविधाही नाही. ई-पासेससाठीही हजारो रु पये मोजावे लागत आहे. त्यातच खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी दोन हजार ते अडीच हजार एकाचे तिकीट केले आहे. यामुळे हिरमोड झाला आहे.
- प्रथमेश गोगरकर, संतप्त प्रवासी
शासनाने आम्हाला केवळ २१ प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. त्यातही प्रवाशांचे परमिट, ई-पास, डिझेलचा खर्च, चालकाचा पगार या सर्व बाबींवरचा खर्च वाढला आहे. तर येताना बस रिकामी आणावी लागत असल्याने मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर नियमात कर भरावे लागणार आहेत.
- बाजीराव दुखते, ट्रॅव्हल्स व्यावसायिक