‘उज्ज्वला’मुळे शिधापत्रिकाधारक ‘गॅस’वर, रेशनकार्ड रद्द होण्याच्या चर्चेने चलबिचल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:16 AM2021-03-31T03:16:21+5:302021-03-31T03:17:16+5:30

सध्या रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना माहिती सादर करण्याचा अर्ज दिला जात आहे. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे.

Ration card cancellation on 'gas' due to 'Ujjwala' | ‘उज्ज्वला’मुळे शिधापत्रिकाधारक ‘गॅस’वर, रेशनकार्ड रद्द होण्याच्या चर्चेने चलबिचल

‘उज्ज्वला’मुळे शिधापत्रिकाधारक ‘गॅस’वर, रेशनकार्ड रद्द होण्याच्या चर्चेने चलबिचल

Next

- सुनील घरत
 
पारोळ : कोरोना संकटकाळात शासनाच्या स्वस्त धान्य योजनेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली नाही; पण आता ज्यांच्याकडे गॅस सिलिंडर आहे, त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविली आहे. यात भरून द्यावयाच्या अर्जात गॅस कनेक्शन असेल तर रेशन कार्ड रद्द होईल, असे हमीपत्र लिहून घेतले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिलबिचल सुरू झाली आहे.

सध्या रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना माहिती सादर करण्याचा अर्ज दिला जात आहे. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे. या माहितीसोबतच सर्व सदस्यांचे आधार कार्ड, वीज बिलाची झेरॉक्स, गॅस कनेक्शनचे कार्ड जोडायचे आहे. या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. त्यात कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे, असे हमीपत्र भरून द्यावे लागत आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक अडचणीत येणार असून, शिधापत्रिका रद्द होण्याची भीती कार्डधारकांना आहे. 

ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून, बहुतांश लोकांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणीदेखील आहे. हे हमीपत्र गरिबांच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे आहे. विभागाने अर्जानुसार कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणात कार्डधारकांच्या शिधापत्रिका रद्द होऊ शकतात. अशी भीती हमीपत्रामुळे निर्माण झाली आहे. आज सर्वसामान्य वर्गातील महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी घरोघरी गॅस देण्यासाठी उज्ज्वला योजना सुरू केली. यामुळे सरपणाची मागणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात निसर्ग संपदाही वाचली, महिलांची धुरापासून मुक्तताही झाली; पण तोच गॅस आता आपल्याला मिळणारे धान्य आपल्यापासून हिरावून घेतोय काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

शिधापत्रिका रद्द होणार नाही 
सर्वसामान्य महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी घरोघरी गॅस देण्यासाठी ‘उज्ज्वला’ योजना सुरू केली. महिलांची धुरापासून मुक्तताही झाली; पण तोच गॅस आता त्यांना मिळणारे धान्य हिरावून घेणार आहे. या हमीपत्रामुळे गॅसधारकांची कुणाचीही शिधापत्रिका रद्द होणार नसून गॅस कनेक्शन कुणाकडे आहे की नाही, याबाबत माहितीसाठी हे हमीपत्र आहे, असे वसईचे पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Ration card cancellation on 'gas' due to 'Ujjwala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.