रेशनकार्ड रद्द होणार नाही; पण कार्डावर मिळणारे रेशन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:09 AM2021-02-13T01:09:49+5:302021-02-13T01:10:16+5:30
अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम झाली सुरू
पारोळ : वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक असल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार, अशा बातम्या काही दिवसांपासून व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. ‘केशरी’ रेशन कार्ड असणारे व यापैकी ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या वर आहे त्यांचे कार्ड ‘श्वेत’ होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होणार आहे, मात्र रेशन कार्ड रद्द होणार नाही, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दिनांक १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. ज्यात शोध मोहिमेंतर्गत शिधापत्रिका तपासणीची कार्यपद्धती ठरविणे, शिधापत्रिका तपासणीचा आढावा घेणे, खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केशरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाख रुपयांच्या वर असेल तर त्यांची केशरी शिधापत्रिका रद्द करून त्या जागी श्वेत शिधापत्रिका देणे, विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.
... तर शिधापत्रिका होऊ शकते रद्द
कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित व्यक्ती ते आणण्यास असमर्थ ठरली तर त्याची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल.
उदा निवासस्थानाच्या पुराव्याबाबत छाननी करताना काही संशयास्पद आढळल्यास, शिधापत्रिकांच्या पुराव्याबत संशय आल्यास त्याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येईल.
हे पुरावे आवश्यक
निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन देयक, वाहनचालक परवाना (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी पुरावे आवश्यक आहेत. मात्र, हे पुरावे एक वर्षाहून जुने नसावेत.
वसई तालुक्यात या मोहिमेला सुरुवात झाली असून १ लाख रुपयांच्या वर वार्षिक उत्पन्न असेल त्याचे रेशनिंग कार्ड रद्द होणार नसून ते ‘सफेद’ होणार आहे. वसईतील नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे.
- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी वसई