तहसील कार्यालयात सुट्टीच्या दिवशी खाजगी लोकांकडून रेशनकार्डची कामे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 01:43 AM2021-04-04T01:43:47+5:302021-04-04T01:44:05+5:30
प्रकरण पोलीस ठाण्यात; काहीही गैर नसल्याचा तहसीलदारांचा दावा
नालासोपारा : वसईच्या तहसील कार्यालयात अनेक खाजगी लोकांकडून कामे करवून घेतली जातात. शुक्रवारी गुडफ्रायडे या सरकारी सुटीच्या दिवशीही खाजगी लोकांकडून रेशन कार्डसंबंधी काही कामे करून घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यावर काही पत्रकारांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेथे धाव घेत पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी वसई पोलीसही हजर होते.
वसई तहसील कार्यालयात बेकायदेशीरपणे अनेक खाजगी लोक काम करतात. सदर प्रकरणी वारंवार तक्रारी करून पाठपुरावा केल्यानंतर शासकीय कार्यालयातून खाजगी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी आदेश काढला. मात्र, आदेशाला धाब्यावर बसवून कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. शुक्रवारी शासकीय सुटी असताना तहसील कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांकडून पुरवठा अधिकारी रोशन कापसे काम करून घेत असल्याची माहिती वसईतील काही पत्रकारांना मिळाली. लगेचच पत्रकारांनी तहसील कार्यालयात बसून कामे करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण केले. हेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले.
हे प्रकरण शेवटी वसई पोलीस ठाण्यामध्ये गेले. वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांनाही वसई पोलीस ठाण्यात जावे लागल्याचे कळते. नेहमी कामाचा भार आणि सर्व्हर डाऊन असल्याने सुट्टीच्या दिवशी काम केले जात असल्याचे सांगून या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
सुटीच्या दिवशी जसे रुटीन काम सुरू असते, त्याप्रमाणे काम सुरू होते. जो आरोप करण्यात आला आहे तसे काहीही नव्हते. मी पोलीस ठाण्यात गेलेली पण दुसऱ्या कामानिमित्त पोलीस निरीक्षकांना भेटण्यास गेले होते.
- उज्ज्वला भगत,
तहसीलदार, वसई
याबाबत माहिती मिळाल्यावर तहसील कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची टीम पाठवली होती. तहसीलदार मॅडमना फोन करून तक्रार केल्याची माहिती दिल्यावर त्या स्वतः वसई पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
- कल्याणराव कर्पे, पोलीस
निरीक्षक, वसई पोलीस ठाणे.