शिवसेनेच्या वर्चस्वाचे ‘फाटक’ पालघर जिल्ह्यात रवींद्र ‘उघडणार’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:58 AM2017-10-26T02:58:43+5:302017-10-26T02:58:53+5:30

पालघर : विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षाचा कालावधी आहे. तरी शिवसेनेने या जिल्ह्यातील राजकीय पटावरील मोहºयांची हलवाहालव करण्यास प्रारंभ केला आहे.

Ravindra will open 'Palghar district' 'gate' of Shivsena? | शिवसेनेच्या वर्चस्वाचे ‘फाटक’ पालघर जिल्ह्यात रवींद्र ‘उघडणार’ ?

शिवसेनेच्या वर्चस्वाचे ‘फाटक’ पालघर जिल्ह्यात रवींद्र ‘उघडणार’ ?

Next

नंदकुमार टेणी 
पालघर : विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षाचा कालावधी आहे. तरी शिवसेनेने या जिल्ह्यातील राजकीय पटावरील मोहºयांची हलवाहालव करण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी रवींद्र फाटक यांची नियुक्ती करून सेनेने पहिली खेळी केली आहे. पूर्वीचे संपर्कप्रमुख अनंत तरे यांना रायगड जिल्ह्यातील शेकापच्या वर्चस्वाखाली असलेल्या चार तालुक्यांच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे व त्यांच्यासोबत माजी महापौर संजय मोरे यांना उर्वरित तीन तालुक्यांच्या संपर्क प्रमुखपदाची सुभेदारी बहाल करण्यात आली आहे.
या पाठीमागे सेनेने मोठी खेळी खेळलेली आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढविणे व हितेंद्र ठाकूरांच्या आणि भाजपच्या वर्चस्वाला शह देणे हा त्यामागचा हेतू आहे. या जिल्ह्यात डहाणू नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पक्षाला जिंकून देणे हे फाटकांसमोरचे पहिले मोठे आव्हान असणार आहे. हा जिल्हा नवनिर्मित आहे. त्यावर कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव नाही. त्यामुळे तो आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न सेना, भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी आणि बविआ हे करीत आहेत. मार्क्सवाद्यांचा या जिल्ह्यावर असलेला प्रभाव ओसरू लागला आहे. विक्रमगडमध्ये निलेश सांबरे यांचे स्थानिक नेतृत्व तेथील नगरपंचायत ताब्यात ठेऊन आहे. नालासोपारा, वसई आणि बोईसर या तीन ठिकाणी बविआचे आमदार आहेत. डहाणू आणि विक्रमगड येथे भाजपाचे आमदार आहेत. तर भिवंडी ग्रामीण आणि पालघर येथे शिवसेनेचे शांताराम मोरे आणि अमित घोडा हे आमदार आहेत. आनंद ठाकूर यांच्या रुपाने विधानपरिषदेचे एक आमदार या जिल्ह्यात आहे. असे संमिश्र चित्र या जिल्ह्याचे आहे. त्यामुळेच आपल्या वर्चस्वाखाली तो आणण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करीत आहेत. परंतु राष्टÑवादीकडे आनंद ठाकूर सोडले तर एकही वजनदार नेता नाही. ठाकूर हे देखील आमदारकीमुळे नेते बनलेले आहेत. बविआचा प्रभाव वसई, नालासोपारा, बोईसर पलिकडे नाही. तिने ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली अगदी नांदेडपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हातपाय मारून पाहिले. परंतु यश मिळाले नाही. त्यामुळे तिचा प्रभाव मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमध्ये एकेकाळी वजनदार असलेले दामू शिंगडा यांचे नेतृत्व मावळतीला गेले आहे. राजेंद्र गावित या माजी राज्यमंत्र्यांच्या रुपाने एकमेव नेता या जिल्ह्यात आहे. परंतु त्यांच्याही नेतृत्वाला पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागतो आहे. भाजपमध्ये सवरा सोडले तर दुसरे नेते नाहीत. धनारे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व रुजायला बराच वेळ लागणार आहे. अशा स्थितीत या जिल्ह्यावर पकड निर्माण करण्याचे स्वप्न शिवसेना पाहत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हा जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अनंत तरे पाचपाखाडी मतदारसंघातून इच्छूक होते. परंतु त्यांना तिथे उमेदवारी मिळाली नाही. बाजूच्या ठाणे शहर मतदारसंघातूनही उमेदवारी मिळाली नाही. ती काँग्रेसमधून सेनेत आलेल्या फाटक यांना मिळाली. त्यामुळे तरे बंडाच्या पवित्र्यात गेले. त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या गळ्यात पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची माळ घालण्यात आली. त्यानंतरच्या तीन वर्षाच्या काळात वसई-विरार महापालिकेची निवडणूक झाली. त्यात सेनेच्या नगरसेवकांची संख्या घटली. त्यानंतर झालेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा विजयी झाले. परंतु त्यात घोडा यांचा व्यक्तिगत करिश्मा मोठा होता. असाच समज शिवसेनेच्या श्रेष्ठींचा होता. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोखाडा नगरपंचायत आणि पालघर नगरपालिका या दोनच निवडणुकीत सेनेला विजय मिळाला. त्यातील मोखाडा नगरपंचायतीतील यश हे सेनेत नव्याने दाखल झालेल्या स्थानिक नेतृत्वाचे होते. अशीच चर्चा होती. त्यामुळे संपर्कप्रमुख म्हणून तरे यांची कामगिरी काय असा प्रश्न तरे यांच्या विरोधकांनी सातत्याने मातोश्रीत उपस्थित केला. त्यांच्याऐवजी एखादा दमदार नेता संपर्कप्रमुख म्हणून द्यावा अशी मागणी गेल्या वर्षभरापासून अनेकांनी मातोश्रीवर केली होती. त्यासाठी रवींद्र फाटक हा दबंग मोहरा पुढे केला गेला. त्यासाठी फाटक हे शिवसेनेत येतांना सात नगरसेवकांना घेऊन आले होते. आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला जे निर्विवाद यश मिळाले त्यात फाटकांचा वाटा मोठा होता, असे सांगितले गेले. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जेव्हा विधानपरिषदेची निवडणुक झाली तेव्हा राष्टÑवादीच्या वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बराला पराभूत करण्यासाठी सेनेने फाटक यांचीच निवड केली होती. डावखरे यांची ही शेवटची निवडणूक आहे, ती त्यांना बिनविरोध जिंकू द्या, या पवारांच्या आवाहनाला सर्व पक्षांनी सहमती दर्शविली असतांना सेनेने मात्र फाटक यांच्या रुपाने जबरदस्त आव्हान सर्वच पक्षांपुढे उभे केले. या निवडणुकीत पालघर जिल्ह्यात बविआची मते मोठ्या संख्येने होती. सेनेने फाटकांसाठी पाठिंबा मागितला असता बविआने डावखरेंच्या पारड्यात आपले वजन टाकले होते. असे असले तरी फाटक यांनी १५३ मते अधिक घेऊन ही निवडणूक जिंकली होती. रवींद्र फाटक यांना ६०२ तर डावखरेंना ४४९ मते मिळाली होती. या निवडणुकीत अपक्ष आणि कुंपणावरील अशा ९० नगरसेवकांची मते फुटली होती. ते काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीचे होते. ती मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याची धूर्तता फाटक यांनी दाखविली होती.
या निवडणुकीत बविआने फाटक यांना पाठिंबा न दिल्याने फाटक यांच्या मनात जी खुन्नस बविआविरोधात होती ती काढण्याची संधी त्यांना या संपर्कप्रमुखपदामुळे आता मिळणार आहे. त्यांच्या शिवसेनेमधील प्रगतीचा हा एका परिने शुभारंभ झाला आहे. आमदार होण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी ठाण्यातून विधानसभेची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढविली असता त्यांना भाजपाच्या संजय केळकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचे स्वप्न सेनेत आल्यावर साकार झाले. त्यानंतर त्यांना प्रथमच सेनेत मोठे पद मिळाले आहे ते ही पालघरसारख्या जिल्ह्यात जिथे काम करून दाखविण्यास भरपूर संधी आहे अशा ठिकाणी मिळाले आहे. जर त्यांनी डहाणू नगर परिषद आणि वाडा नगर पंचायत जिंकून दिली तर त्यांच्या या नियुक्तीवर सार्थकतेचे शिक्कामोर्तब होईल.
तरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात बंडाचा पवित्र घेतला नसता तर चित्र वेगळे दिसले असते. फाटक यांना शिवेसेनेत आणत असतांना शिंदे यांच्यापुढे विधानसभा निवडणुकीबरोबरच ठाणे महापालिकेची निवडणुकही प्रकर्षाने होती. फाटक सेनेत आलेत म्हणूनच त्यांच्या प्रभावाखाली प्रभागात सेनेचे उमेदवार विजयी झाले आणि सेनेला त्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाले. हे राजकारण दूरदर्शीपणाने तरेंनी त्यावेळी समजावून घेऊन बंड केले नसते तर आज तरे एखाद्या मोठ्या पदावर विराजमान झालेले दिसले असते. परंतु विधानसभेची उमेदवारी देतांना जी उपेक्षा झाली त्यामुळे तरे इतके संतप्त झाले की, त्यांनी बंडाचा झेंडा घेतला. त्यातून साºया प्रतिकूल घडामोडी घडत गेल्या.
>तरे यांच्याकडे रायगडमध्ये महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. हा संपूर्ण पट्टा शेकापच्या वर्चस्वाखालील आहे. पेण आणि अलिबाग हे तर शेकापचे बालेकिल्ले. यामुळे येथे किती मोठे आव्हान उभे आहे याची जाणीव तरेंना निश्चितच असेल. अंतुलेंच्या विरोधात त्यांनी लोकसभेची निवडणूक पूर्वी लढविली होती व अंतुलेंच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला होता. फेरमतमोजणीत ते विजयी होणार अशी चिन्हे होती. परंतु अंतुले यांनी बाळासाहेबांना साकडे घालून या फेरमतमोजणीसाठी आग्रह न धरण्याचा सल्ला तरेंना द्या, असे विनविले होते. बाळासाहेबांनी तसा आदेश दिल्यामुळे अंतुले त्या निवडणूकीत कसेबसे विजयी झाले आणि या आज्ञाधारकपणाचे फळ म्हणून शिवसेनाप्रमुखांनी तरेंना विधानपरिषदेची आमदारकी बहाल केली होती. हा इतिहास स्वत:च्याच बाबतीत घडलेला असतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तरेंनी बंडाचा पवित्र का घेतला? हा प्रश्न शिवसैनिकांना व त्यांच्या समर्थकांना छळतो आहे.

Web Title: Ravindra will open 'Palghar district' 'gate' of Shivsena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.