परिवहन सेवेला पुन्हा ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:02 PM2020-02-11T23:02:22+5:302020-02-11T23:02:22+5:30
ठेकेदाराने आश्वासन पाळले नाही : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, नागरिकांचे हाल
विरार/नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ठेकेदाराने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासून अचानक बंद पुकारला. कर्मचाºयांनी सर्व बसेस बंद ठेवल्याने एकही बस वसई तालुक्यात रस्त्यावर धावली नाही. यामुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
७०० परिवहन कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी मकरसंक्रांतीच्या दिवशी अचानक कामबंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान परिवहन ठेकेदाराने बससेवा चालविण्यासही असमर्थता दाखवली होती. त्या वेळी चौथ्या दिवशी महानगरपालिकेने मध्यस्थी करत ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यात चर्चा करून यावर तोडगा काढला होता. यानुसार मागील काही महिन्यांपासून वेळेवर होत नसलेले पगार दर महिन्याच्या १० तारखेला होतील. रखडलेले पगार तातडीने केले जातील. दर सहा महिन्यांनी ५०० रुपये वेतनवाढ देण्याचे ठरले. त्याचप्रमाणे पीएफचे पैसे व कर्मचारी सोसायटीत कामगारांचे पैसे वर्ग करण्याचे आश्वासन पालिका आणि ठेकेदाराकडून देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने वचनपूर्ती न केल्याने कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी पुन्हा अचानक काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. महामार्गाकडे जाणाºया नागरिकांना तसेच ऐन परीक्षेचे कालावधीत विद्यार्थ्यांना शाळाही गाठता आल्या नाहीत. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आंदोलनामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाºयांशी बोलणी सुरू असून लवकरच तोडगा निघेल, असे परिवहन ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी सांगितले.
परिवहन विभागातील मनसेच्या संघटनेने स्टंटबाजी करत हा संप पुकारला आहे. १० तारीख कालच झाली असून एक दिवस पगार न झाल्याने हे संपाचे हत्यार उगारले आहे.
- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई-विरार महानगरपालिका
गेल्या वेळी संप केल्यावर तीन दिवसांनी मध्यस्थी करून मागण्या मान्य करण्याचे लेखी कबूल केले होते, पण १० तारीख उलटूनही कामगारांच्या खात्यावर पगार अद्याप आला नसल्याने आज आंदोलन पुकारले आहे.
- विश्राम मोंढे, कार्याध्यक्ष, मनसे, महानगरपालिका कर्मचारी सेना.