पुढाऱ्यांच्या शिफारशी वेट अॅण्ड वॉचवर
By admin | Published: September 29, 2016 03:25 AM2016-09-29T03:25:40+5:302016-09-29T03:25:40+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय
- शौकत शेख, डहाणू
आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने होऊनही दस्तूर खुद्द आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा तसेच आमदार, खासदारांनी वसतिगृहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून प्रवेश देण्यासाठी तीनशे शिफारसपत्रांना डहाणू आदिवासी विकास विभागाने विचाराधीन ठेवले आहे.
डहाणू, तलासरी, पालघर, वसई भागात राहणारे विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतात. या वर्षी शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरी ही हजारो विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे कासा, दापचरी, भापोली, विक्रमगड, काचोई, वेढे इत्यादी भागातील हजारो विद्यार्थ्यांना दररोज शंभर ते दीडशे रुपये मोजून प्रवास करावा लागत आहे. अशा दुर्गम भागांतील येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पालघरचे खासदार चिंतामण वनगा, डहाणू मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे, पालघरचे आमदार अमित घोडा, आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार विलास तरे यांनी सुमारे तीनशे शिफारसपत्रे आदिवासी विकास विभागाला गेल्या एक महिन्यापासून दिले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा वाढीव तुकडीची परवानगी शासनाकडून मिळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही.
लालफितीचा फटका
आदिवासी विकास विभगाने वरील पुढाऱ्यांचे पत्र अप्पर आयुक्त ठाणे यांना खास बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. तिथून आदिवासी आयुक्त नाशिक यांच्याकडे मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल.
एकंदरच शिफारसपत्र घेणाऱ्या आदिवासी पालकांच्या पदरी निराशाच आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू प्रकल्पांतर्गत एकूण १७६ निवासी वसतिगृहांची संख्या व क्षमता वाढत नसल्याने दरवर्षी हजारो आदिवासी विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून आपल्या कुटुंबाबरोबर मजुरी करण्यासाठी स्थलांतर करीत असतात.