कूपनलिकेच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:33 AM2021-03-10T00:33:57+5:302021-03-10T00:35:03+5:30
मुसारणे पाड्याच्या बळीराजाची किमया
वसंत भोईर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील मुसारणे पाडा येथील शेतकऱ्यांनी स्वतः कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टाेमॅटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा आतापर्यंत भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. या वर्षी टोमॅटो शेती लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुसारणे पाडा हे एक छोटेसे खेडेगाव असून गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव अथवा कालवा नाही, मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई टाेमॅटाे शेतीने भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
टाेमॅटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वतःच रोप तयार करतात व त्याची लागवड करतात. सर्वप्रथम भात पीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात त्याची लागवड केली जाते. साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळतोडणी झाली तरच पुढचे फळ व्यवस्थित होते.
एका एकराला १५०० कॅरेट टाेमॅटाे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रुपये खर्च येतो, मात्र जसा बाजारभाव असेल त्याप्रमाणे नफा-तोटा होतो. या वर्षी आतापर्यंत टोमॅटोला चढता-उतरता भाव असला तरी ठीक आहे, नफा होईल अशी आशा निश्चितच आहे. येथील जमीन टोमॅटोसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ठिंबक सिंचनामुळे मजूरही कमी लागतात, अशी माहिती परशुराम पाटील यांनी दिली.
तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे - पाटील
दैनंदिन आहारात टाेमॅटाे हा महत्त्वाचा घटक आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टाेमॅटाे उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने हा माल भिवंडी येथे स्वतः शेतकऱ्यांना घेऊन जावा लागतो. नाहीतर दलालांमार्फत विकावा लागतो, अशी माहिती युवा शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरुणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.