वाडा तालुक्यातील गातेसमध्ये झेंडूचे विक्रमी पीक
By admin | Published: March 5, 2017 02:26 AM2017-03-05T02:26:29+5:302017-03-05T02:26:29+5:30
तालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. भातशेतीची कापण
- वसंत भोईर, वाडा
तालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. भातशेतीची कापण झाल्यानंतर येथील शेतकरी आता फूलशेती, भाजीपाला व कडधान्य शेतीकडे वळत आहेत. या शेतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने ही शेती शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेती दरवर्षी तोट्यात जात असल्याने शेतकरी आता फूलशेती, भाजीपाला शेतीकडे वळला आहे. हे वैतरणा नदीच्या काठावर वसलेले छोटेसे खेडे गाव आहे. नदीवर गातेस व कोनसई येथे बंधारे बांधल्याने येथे बारमाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे येथील शेतकरी भातशेती नंतर इतर शेती करत आहेत. या गावात रब्बी हरभऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील शेतकरी फुलझाडांची लागवड करतांना दिसत आहेत. या गावात ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. झेंडूच्या विविध जातींच्या झाडांची लागवड केली जाते. यामध्ये जम्मू, कोलकता, अॅरोगोल्ड, मारीगोल्ड, कोलकाता व्हरायटी अशा जातींच्या झाडांचा समावेश आहे.
या फुलांच्या रोपांना कळ््या लागल्यानंतर पहिल्या वेळेस त्या पोळ््यासह काढून टाकल्या जातात तर दुसऱ्या वेळी लागलेल्या कळ््या ठेवून नंतर फुले तोडली जातात.
पहिल्या वेळेस कळ््या काढल्याने पुढील उत्पादन वाढते. असे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. प्रत्येक सणावारास तसेच शुभ कार्याला अन्य फुलांप्रमाणे किंबहुणा या फुलांची मागणी
जास्त असते. त्यामुळे अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणाऱ्या झेंडूची लागवड करणे हा शेतकऱ्यांना चांगला पर्याय आहे.
दादर आणि कल्याणातून मागणी
येथील हवामन आणि जमीन या फूलशेतीसाठी योग्य असल्याने या पिकाचे मोठे उत्पन्न येते. हे झाड दोन ते तीन महिन्यात फूल देते. एका एकराला ३० ते ३५ हजारांचा खर्च येतो. मात्र, दोन महिन्यांत एका एकरातून एक ते सव्वा लाखांचे उत्पन्न मिळते.
आजमितीस ५० ते ६० रुपयांचा प्रति किलो भाव आहे. हा माल दादर येथील फूलबजारात व कल्याण येथे विकला जातो. व्यापारी माल घेण्यासाठी जागेवर येतात. अशी माहिती येथील शेकऱ्यांनी दिली. बाजाराच्या चढत्या-उतरत्या भावावर दर अवलंबून असतात. त्यामुळे कोणत्या हंगामात हे फूल लावले पाहिजे हे ओळखल्यास जास्त उत्पन्न मिळते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवड झाल्यास चांगला भाव मिळतो.