भरपाई नंतरच ताब्यात घेतले नातेवाईकांनी पार्थिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:09 AM2018-06-02T01:09:04+5:302018-06-02T01:09:04+5:30
तालुक्यातील तोरणे या गावाच्या हद्दीत असलेल्या तोरणे इस्पात या कंपनीत बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास भट्टीमध्ये
वाडा : तालुक्यातील तोरणे या गावाच्या हद्दीत असलेल्या तोरणे इस्पात या कंपनीत बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास भट्टीमध्ये स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता.या कामगारांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्याने कंपनी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.अखेर आज दुपारनंतर नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्यानंतर नातेवाईकांनी शव ताब्यात घेतले दरम्यान, आज दुपारी कंपनी संचालकालाही नातेवाईकांनी काही काळ घेराव घातला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.
तोरणे इस्पात या कंपनीत गेल्या बुधवारी संध्याकाळच्या सुमारास भट्टीमध्ये स्फोट झाला होता. त्यात भट्टी शेजारी काम करणारे निलेश यादव, संजय गुप्ता, सनी वर्मा व विनोद यादव यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाडा शवागारात ठेवण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांनी योग्य ती भरपाई मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्याने अखेर कुणबी सेनेचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर वेखंडे यांनी संचालकांशी चर्चा करून मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ दोन लाख रुपये व अंत्यसंस्काराचा खर्च तसेच जखमी कामगार विकास सिंग याचा उपचारासाठी येणारा खर्च कंपनीचे संचालक मकसुद खान यांनी देण्याचे मान्य करुन त्याचा धनादेश तत्काळ दिले. यानंतर नातेवाईकांनी शव आपल्या ताब्यात घेऊन ते उत्तर प्रदेशातील गावी रवाना झाले.