नातेवाइकांनाही व्हावे लागणार मनोरुग्णांसोबत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:44 AM2018-09-27T06:44:33+5:302018-09-27T06:44:54+5:30
नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. २ आॅक्टोबरपासून ही कार्यपद्धती ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात लागू होणार असल्याची माहिती मनोरुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र, या निर्णयास किती मनोरुग्णांचे नातेवाईक प्रतिसाद देतील, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेंटल हेल्थ अॅक्टमधील व्हॉलेंटरी बोर्ड अॅडमिशनअंतर्गत ही कार्यपद्धती सुरू होणार आहे. मनोरुग्णास दाखल करून गेल्यावर अनेकदा त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला येत नाही किंवा घेऊनही जात नाहीत, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयाला नातेवाइकांचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हा नियम ओळखीच्या मनोरुग्णांसाठी म्हणजेच ज्यांना स्वत:हून मानसिक आजार बरा करण्यासाठी दाखल व्हायचे आहे, अशांसाठी लागू करण्यात येणार आहे. याआधी ओळखीच्या आणि अनोळखी मनोरुग्णांना कोर्टाच्या कायदेशीर कार्यवाहीनुसार दाखल करून घेतले जात होते. आता ओळखीच्या मनोरुग्णांची कोर्टाच्या कायदेशीर कार्यवाहीच्या माध्यमातून सुटका केली जाणार असून त्यांना व्हॉलेंटरी बोर्ड अॅडमिशननुसार दाखल करून घेतले जाणार आहे. कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया ही नातेवाइकांना मानसिक त्रास देणारी, लांबलचक, किचकट आहे. यात मनोरुग्णाला दाखल करून घेण्यासाठी कमीतकमी पाच ते जास्तीतजास्त २४ तास लागतात. त्यामुळे व्हॉलेंटरी बोर्ड अॅडमिशननुसार होणारे अॅडमिशन नातेवाइकांसाठी सोयीस्कर ठरेल, असे अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले.
२४ तासांची सक्ती नाही
मनोरुग्णांसोबत नातेवाईक २४ तास राहिलेच पाहिजे, अशी सक्ती नसेल. रात्रीच्या वेळी ते आपल्या रुग्णाकडे येऊ शकतात, असे अधिक्षक बोदाडे यांनी सांगितले. मनोरुग्णांना दाखल केल्यानंतर नातेवाईक दुसºया दिवशी न येण्याची भीती असल्याने ही अट घालणार आहे.