बांबूपासून बनवलेल्या राख्यांचे राज्यपालांच्या हस्ते विमोचन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:52 AM2020-07-07T01:52:14+5:302020-07-07T01:52:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वसई : पालघर जिल्ह्यातील आदिवासी (वनवासी) भगिनींनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून यंदाही राष्ट्र सेवा समिती प्रकल्प भालिवली येथे प्रशिक्षित होऊन तयार केलेल्या बांबूंच्या राख्यांचे सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात विमोचन करण्यात आले. या वेळी समितीचे व्यवस्थापक लुकेश बंड, प्रगती भोईर, डॉ. अलोक चौबे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून वनवासी भगिनींना बांबूपासून निरनिराळे आकर्षक व दर्जेदार उत्पादन करण्याचे प्रशिक्षण मागील पाच वर्षांच्या काळापासून सेंटरच्या भालिवली येथील प्रकल्पावर देण्यात येत आहे. या प्रशिक्षणानंतर आपले घरकाम सांभाळून फावल्या वेळात सदर महिला बांबूपासून हस्तकलेच्या वस्तूही त्या तयार करतात व या माध्यमातून त्यांना चांगला सन्मानजनक रोजगार देखील प्राप्त होतो आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या भगिनींनी पुढे येऊ घातलेल्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा धागा म्हणजेच राखी ही बांबूपासून वेगवेगळ्या रंगात व ढंगात अत्यंत आकर्षक स्वरूपात तयार केल्या आहेत.