कासवाची सुटका, मच्छीमारास बक्षीस, राज्यातील पहिलीच घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:25 AM2019-01-25T00:25:16+5:302019-01-25T00:25:25+5:30
वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले.
- हितेन नाईक
पालघर : वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. शासनाच्या दुर्मीळ प्रजाती संरक्षण अधिनियमान्वये या बोट आणि मालक २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईस पात्र ठरले आहेत. बहुदा राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
वडराई येथील ही बोट २३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता मासेमारीसाठी रवाना झाली. समुद्रात १० नॉटिकल समुद्री क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील १२ डोल नेट जाळे कवींच्या खुंटाला लावले आणि मासे आपल्या जाळ्यात अडकण्याची ते वाट पाहू लागले. काही तासांच्या विश्रांती नंतर त्यांनी एक- एक डोल जाळे आपल्या बोटीत खेचायला सुरुवात केली. सातवे डोल जाळे आपल्या बोटीत घेतल्यावर जाळ्यात पाय अडकलेल्या कासवाची सुटकेसाठी धडपड सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या धडपडीत त्या कासवाच्या पायाला इजा पोहोचू नये, म्हणून गणेश मेहेर या मच्छीमाराने आपले डोल जाळे मधोमध फाडून १५ किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका करून त्याला समुद्रात सोडले. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. आपल्या जाळ्याचे नुकसान करून कासवाची सुटका केल्याने शासनाकडून दिले जाणारे २५ हजाराचे बक्षीस तुला मिळू शकते, याची माहिती त्याला दिली.
>डॉल्फिन, शार्क, कासवांना संरक्षण
बेसुमार व अनियंत्रित मासेमारीमुळे डॉल्फिन, शार्क, कासव सारख्या अनेक दुर्मीळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे. हे दुर्मीळ मासे जाळ्यात सापडल्यानंतर त्याची सुटका करतेवेळी मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाल्यास नुकसानीपोटी त्यांना २५ हजार रुपयांची भरपाई मिळणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ रोजी काढले होते.
>आम्ही मच्छीमार कासव, देवमासा यांना देवस्वरूप मानून नेहमीच त्यांची नारळ, तांदूळ वाहत सुखरूप सुटका करतो. आता पर्यंत ५ ते ७ मोठे कासव आम्ही समुद्रात सोडले आहेत.
- गणेश मेहेर, मच्छीमार