वसई तहसीलदारांना पदमुक्त करा; काँग्रेसचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:54 PM2019-07-24T22:54:10+5:302019-07-24T22:54:17+5:30

वसईत एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन; मुख्यमंत्र्यांनाही दिले निवेदन

Release Vasai Tahsildar | वसई तहसीलदारांना पदमुक्त करा; काँग्रेसचा नारा

वसई तहसीलदारांना पदमुक्त करा; काँग्रेसचा नारा

googlenewsNext

वसई : गतिमान महसूल प्रशासन हे ब्रीद आता फक्त कागदावर राहिले असून वसईचा महसूल विभाग पुरता दिशाहीन झाला आहे. वसई तालुक्याचे तहसीलदार जनतेच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष देत नसल्याने तसेच शासनाने नेमून दिलेले दायित्वही पाळत नाही. हे महत्त्वाचे काम करण्यासाठी येथील महसूल प्रशासन असमर्थ ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई तहसीलदारांना निष्कासित करणे हाच योग्य पर्याय असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी वसईत म्हटले आहे.

विजय पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सोमवारी सकाळी वसई तहसीलदारांच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या प्रसंगी वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना पदावरून दूर करा, या मागणीसाठी पाटील यांनी वसई प्रांताधिकारींच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही दिले आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानवनिर्मित कारणांमुळे वसईच्या शहरी तसेच ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. तर वसई रोड भागात अनेक जुन्या चाळी, वसाहतींच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने लोकांचे संसार उघड्यावर आले. अनेक घरे व दुकानदारांचे मोठे नुकसानही झाले. यामध्ये वसई रोड भागातील नवघर पूर्व, पश्चिम भाग, दिवाणमान, सी कॉलनी आदी ठिकाणी तर आठवडाभर तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी साचून राहिले होते. गंभीर म्हणजे पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्ग खुले करण्यात न आल्याने तथा सदोष नालेसफाईमुळे ही स्थिती उद्भवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
त्यात पश्चिम पट्टीत अर्नाळा, वसई कोळीवाडा येथील वाल्मिकीनगर क्षेत्र वसईचा बागायती पट्टा आधी अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने सामान्य शेतकरी व जनतेचे मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी वेळीच पंचनामे करण्यात यावेत तथा बाधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विजय पाटील यांनी ८ जुलै रोजी केली होती. तर यासाठी पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला तब्बल पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती.

परंतु महसूल प्रशासनाने योग्य वेळी नुकसानग्रस्तांचे पंचनामे केले असते, तर त्यांना महापालिका घरपट्टी करात सूट शासनाकडूनही नुकसान भरपाई आदी लाभ मिळणे शक्य होते. मागणी करूनही व आंदोलनाचा इशारा देऊनही वसई तहसील प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम केले नाही. यामुळे विजय पाटील यांनी सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

तहसीलदारांचे चर्चेचे आमंत्रण
पाटील यांना चर्चेसाठी पाचारण करून पावसाळी पाणी साठवण्याचा प्रकार व अन्य मुद्याबाबत तहसीलदारांनी चर्चा केली. वसई तहसीलदार कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठ्यांची पुरेशी संख्या नसल्याने पंचनामे वेळेत होऊ शकले नाहीत तथा पंचनामे करण्याचे सोपस्कार सुरू असल्याचे तहसीलदारांनी चर्चेवेळी स्पष्ट केलं. मात्र एकूणच या सर्व परिस्थितीवर मिळालेल्या उत्तराने समाधान न झालेल्या विजय पाटील व सहकाऱ्यांनी वसई तहसीलदार यांना पदमुक्त करण्याची मागणी लावून धरली.

Web Title: Release Vasai Tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.