पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी; २०२२ मध्ये २,७३८ प्रकरणात फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:15 PM2023-01-24T19:15:21+5:302023-01-24T19:15:44+5:30

मंगेश कराळे नालासोपारा- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर विषयक तक्रारींची चौकशी व सायबर गुन्ह्रांच्या तपासाकरीता गुन्हे शाखेअंतर्गत सायबर गुन्हे ...

Remarkable achievements of Cyber Division of Police Commissionerate; 2,738 cases of fraud in 2022 | पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी; २०२२ मध्ये २,७३८ प्रकरणात फसवणूक

पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी; २०२२ मध्ये २,७३८ प्रकरणात फसवणूक

Next

मंगेश कराळे

नालासोपारा- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर विषयक तक्रारींची चौकशी व सायबर गुन्ह्रांच्या तपासाकरीता गुन्हे शाखेअंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे. या विभागाने २०२२ या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत २,७३८ प्रकरणात फसवणूक झालेली तब्बल ९१ लाख ९४ हजार ८३३ रुपये पीडितांना परत केले आहे.  आयुक्तालयातील फसवणूक झालेल्या नागरिकांच्या ऑनलाईन फसवणूक तक्रारी संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. त्यासाठी अनेकदा महिलांना तुमच्या घरी ऑनलाईन पार्सल येत आहे. आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, बँकेत केवायसी नाही, आधार नंबर सांगा, ओटीपी सांगा, मोबाईल नंबर सांगा असे फोन करून माहिती मागण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकांना तर थेट लाखो रुपयांची लॉटरी लागली आहेत असे संदेश पाठवले आहेत, तर अनेकांना लॉटरी लागल्याचे फोन कॉलही येत आहेत. सोबतच प्ले स्टोरमधून एनीडेस्क, क्विक सपोर्ट आणि टीम व्यूअर सारखे ॲप्स डाउनलोड केल्यावर फसवणूक होत आहे. सायबर गुन्हे कक्ष येथे सामान्य नागरिकांचे ऑनलाईन फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच तात्काळ (गोल्डन हवर्स) मध्ये ज्या बँक/वॉलेटमध्ये रक्कम गेली असेल त्याबाबत सायबर गुन्हे कक्षाचे पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी अहोरात्र अथक प्रयत्नांनी सदर रक्कमेबाबत पत्रव्यवहार व वेळोवेळी पाठपुराव्याच्या आधारे तक्रारदार यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेविना सन २०२१ व २०२२ मध्ये रक्कम परत मिळवून देण्यात यश आलेले आहे. २०२१ मध्ये ७९४ अर्ज आणि २०२२ मध्ये २,७३८ तक्रार अर्ज सायबर विभागात प्राप्त झाले होते. सायबर पोलिसांनी २०२१ मध्ये २८ लाख ८० हजार ९६९ रुपये आणि २०२२ मध्ये ९१ लाख ९४ हजार ८३३ रुपये पीडितांना परत केले आहे.

सन २०२२ मध्ये एकूण २७ प्रकरणांमध्ये आरोपी शोधून त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे नोंद असलेले सायबर फसवणूकीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच सायबर गुन्हे कक्षाकडून आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता सायबर तपासाबाबत २२ प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. फसवणूकीच्या प्रकारांबाबत माहिती देण्याकरीता १२ विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायबर फसवणूकीचा प्रकार आपल्यासोबत घडल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच १९३० या हेल्पलाईनवर तक्रार देण्याचे नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे. 

सदरची कामगिरी तत्कालिन पोलीस उपायुक्त (गुन्हे), डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबूरे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस हवालदार माधूरी धिंडे, प्रविण आव्हाड, गणेश इलग, पल्लवी निकम, सुवर्णा माळी, अमिना पठाण यांनी पार पाडली आहे.

Web Title: Remarkable achievements of Cyber Division of Police Commissionerate; 2,738 cases of fraud in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई