अडीच लाख वाहनचालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:04 PM2018-12-20T22:04:36+5:302018-12-20T22:05:28+5:30
केंद्र सरकारने पेट्रोलच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन युक्ती लढविली आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर होत असून तो १५ टक्के करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र सरकारने पेट्रोलच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन युक्ती लढविली आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर होत असून तो १५ टक्के करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबतचा ठोस निर्णय झाल्यास पेट्रोलच्या दरात किमान दहा रुपयांनी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
स्वदेशी इंधन म्हणून इथेनॉलकडे पाहिले जाते. निती आयोगही इथेनॉलच्या वापरावर आग्रही आहे. ऊसाच्या मळीपासून इथेनॉल हे इंधन सर्वाधिक तयार केले जाते. स्वदेशी इंधन म्हणून ब्राझीलमध्ये योग्य पद्धतीने त्याचा ३५ टक्के वापर केला जातो. तेल कंपन्यांना सरकारकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यामुळेच सध्या तेल कंपन्या गब्बर होत असल्याचा आरोप सर्वस्तरातून होताना दिसतो. याच आरोपांना तगडे उत्तर देण्यासाठी व वाहनचालक नागरिकांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या जास्त वापराचा विषय सरकारच्या विचाराधीन आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर केल्या जात असून निती आयोगाच्या आग्रहाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढविल्यास पेट्रोलचे दर तब्बल १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय सुमारे २० रुपये प्रती लिटरचा दर असलेल्या इथेनॉलला पेट्रोलमध्ये मिसळताच पेट्रोलचा दर मिळणार आहे, हे विशेष.
दरात १० रुपयांनी होणार घसरण
सद्यस्थितीत केंद्र व राज्य सरकारकडून लादण्यात आलेल्या विविध करांमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात कमालीची वाढ कायम असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर होत आहे. पेट्रोलमध्ये १० ऐवजी १५ टक्के इथेनॉलचा वापर करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असून तसा ठोस निर्णय झाल्यास पेट्रोलच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विमानाचा प्रयोग ठरला यशस्वी
स्वदेशी इंधन म्हणून इथेनॉलकडे बघितले जाते. इथेनॉल या इंधनावर ना. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात देहरादून ते दिल्ली असा विमान चालविण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे.
जिल्ह्यात २.२७ लाख दुचाकी
वर्धा जिल्ह्यात सद्यस्थितीत २ लाख २७ हजार ४३७ च्यावर दुचाकींची संख्या असल्याचे सांगण्यात येते. तशी नोंदही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांचीही संख्या मोठी आहे. शासनाच्या विचाराधीन असलेल्या सदर निर्णयावर ठोस निर्णय झाल्यास त्याचा फायदा त्यांना होईल.
पेट्रोल व डिझेलवर महाराष्ट्रात सर्वाधिक कर
देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक कर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील वाहनचालकांना इतर राज्यापेक्षा जादाच पैसे पेट्रोल व डिझेलसाठी मोजावे लागत आहे.
पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याबाबत तांत्रिक माहिती नाही; पण ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल तर आपण त्याचे स्वागत करू. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध करांमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ कायम आहे. भाजप सरकारने त्यांचा महसूलही कमी न होऊ देता पेट्रोल व डिझेलच्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपाययोजना करायला पाहिजे. फक्त पेट्रोलमध्ये इथेनॉलची ५ टक्के भेसळ जास्त करून आम्ही पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी केले, असा ढोल बडवू नये.
- रणजित कांबळे, आमदार, वर्धा.
इथेनॉल हे स्वदेशी इंधन आहे. त्याचा पेट्रोलमधील वापर वाढावा याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. सध्या पेट्रोल मध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर होतो. त्याचा वापर १५ टक्के झाल्यास पेट्रोलच्या दरात घट होईल. इतकेच नव्हे तर शेतकºयांनाही त्याचा फायदा होईल.
- रामदास तडस, खासदार, वर्धा.