महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्याचे पडसाद; पोलीस सुरक्षित नाहीत, अन्य महिलांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:02 PM2020-03-08T23:02:21+5:302020-03-08T23:02:37+5:30
शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यावरील नॉव्हेल्टी हॉटेलजवळील बर्गर किंग पॉईंट येथे बर्गर घेण्यासाठी गाडी थांबवली
नालासोपारा : महिला दिनाच्या पूर्वसंंध्येला स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर आरोपीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे दरवर्षी वसई तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात साजरा होणारा जागतिक महिला दिनावर यंदा हल्ल्याचे सावट आले असून नालासोपारा पोलीस ठाण्यात फक्त महिलांना कारभार देण्यात आला आहे. तर या हल्ल्याचे सर्वच पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी निषेध जाहीर व्यक्त केला असून महिला दिन कसा काय साजरा करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
जागतिक महिला दिन रविवारी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, पण पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत महिला दिन साजरा केला नाही. नालासोपारा पोलीस ठाण्यात नाममात्र महिला दिन साजरा केला आहे. ठाणे अंमलदार म्हणून दीपाली कदम तर दिवस पाळी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक भाविका माहीमतुरा यांनी कारभार स्वीकारला होता. एका महिला पोलीस अधिकाºयांंवर आरोपीने शनिवारी रात्री विरार फाट्यावर फायरिंग करून हल्ला केल्याने पोलीस ठाण्यात महिला दिन साजरा केला गेला नाही.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर
शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यावरील नॉव्हेल्टी हॉटेलजवळील बर्गर किंग पॉईंट येथे बर्गर घेण्यासाठी गाडी थांबवली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर दुचाकीवरून तोंडाला मास्क आणि अंगात जॅकेट परिधान केलेल्या आरोपीने त्यांच्या दिशेने रिव्हॉल्वर रोखल्याचे सोबत असलेल्या पोलीस कर्मचारी प्रशांत ठाकूर याने पाहिले आणि ओरडला.
महिला अधिकाºयाने तो आवाज ऐकून वाकल्याने आरोपीने झाडलेली गोळी त्यांच्या गाडीच्या बोनेटवर लागली आणि त्यांचा जीव सुदैवाने वाचला. ही घडलेली घटना सगळीकडे वाºयांसारखी पसरल्यावर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रभर नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्रीपासून अनेक पोलिसांच्या टीम आरोपीला पकडण्यासाठी तयार केल्या असून कंबर कसली आहे.
उपसभापतींनी घेतली हल्ल्याची माहिती
शनिवारी रात्री महिला अधिकाºयावर आरोपीने दुचाकीवरून फायरिंग केल्याची घटनेची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोºहे यांचे स्वीय सहायक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटमधील सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्याशी मोबाईलवर फोन करून जाणून घेतल्याचे समजते.