हाताने मानवी मैला सफाईबाबत प्रतिबंध; वसई-विरार महापालिकेचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:46 AM2021-01-29T00:46:35+5:302021-01-29T00:46:50+5:30
आढळल्यास कारवाईचे आयुक्तांचे आदेश
नालासोपारा : वसई-विरार महापालिका हद्दीत हाताने मानवी मैला सफाईबाबत प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत हाताने मानवी मैला उपसता येणार नाही. मालमत्ताधारकांनी/ गृहनिर्माण संस्थांनी यांत्रिक पद्धतीशिवाय हाताने अथवा इतर पर्यायांनी सेप्टिक टँक साफ करणे, उपसण्याचे काम करवून घेतल्यास आणि काही अनुचित प्रकार घडल्यास मालमत्ताधारक / गृहनिर्माण संस्था यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश मनपा आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ केंद्र शासनाने पारित केलेला आहे. त्यानुसार दिलेल्या न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुख्यत: मॅन्युअल स्कॅव्हेन्जर्सचे काम करताना झालेला मृत्यू कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत असला तरी सुरक्षित साधनाशिवाय दूषित गटारात उतरणे हा गुन्हा मानून संबंधित व्यक्तींवर किंवा कामाचे आदेश देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मृत्यूकरिता मयत व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांची अंमलबजावणीसाठी वसई महापालिकेने गृहनिर्माण संस्थांमधील निघणाऱ्या शौचालयातील मैला यांत्रिकी पद्धतीने उपसून विल्हेवाट लावण्यासाठी प्रभाग समिती ‘ए’मधील बोळींज येथे एसटीपी प्लांट उभारला आहे.
एसटीपी प्लांटवर पुढील प्रक्रिया
महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारक व गृहनिर्माण संस्थांनी सेप्टिक टँकमधील मैला उपसण्यासाठी संबंधित प्रभागाच्या सा.आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून, निश्चित केलेली रक्कम जमा करून यांत्रिक पद्धतीने मैला टँकरमध्ये उपसून एसटीपी प्लांटवर पुढील प्रक्रियेसाठी नेणे बंधनकारक करण्यात आले आहे.