तिवरांची कत्तल करून सातपाटी खाडीत रेतीबंदर; अनधिकृत जागेचे सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:57 AM2020-08-25T00:57:01+5:302020-08-25T00:57:09+5:30
महसूल, वनविभागाकडे मागणी
हितेन नाईक
पालघर : सातपाटी-मुरबे खाडीतून बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन केले जात असून ही चोरटी रेती उतरविण्यासाठी किनाऱ्यालगतच तिवरांची कत्तल करून अवैधरीत्या रेतीबंदर उभारले गेले असल्याच्या तक्रारी आहेत. महसूल आणि वन विभागाने संयुक्तरीत्या या अनधिकृत बंदराच्या जागांचे सर्वेक्षण करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करून वन विभागाने आपल्या जागा ताब्यात घेण्याची मागणी केली जात आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीमध्ये खाडी, समुद्रात यांत्रिक बोटींना बंदी असताना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिकर्म अधिकाऱ्यांनी मुरबे येथील अनिल केशव पाटील यांना ६ जुलै रोजी प्रति माह १०० ब्रास रेती उत्खनन व वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. नौका मार्ग बंद असताना देखील मुरबे येथील दूध खाडीत (सातपाटी-मुरबे खाडी) साचलेला गाळ काढून नौकानयन मार्ग सुकर करण्याच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिकर्म अधिकाºयाने दिलेला नियमबाह्य परवाना आणि वाहतुकीबाबत तक्रारी पुढे आल्यानंतर हा परवाना महसूल विभागाला रद्द करावा लागला होता. रेती वाहतुकीबाबत दिलेल्या रॉयल्टी बुकमधील पावत्यांचाही दुरुपयोग केला जात आहे.
दूध खाडीमधून मुरबे, दापोली आदी भागांतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या दिवसाढवळ्या यांत्रिक बोटीद्वारे रेती उत्खनन सुरू आहे. जिल्ह्यात रेती उत्खनन, वाहतुकीला पूर्णत: बंदी असल्याचे अधिकारी अनिल कांबळे यांनी 'लोकमत'ला सांगितले. असे असताना सातपाटी-मुरब्याच्या दूध खाडीत रविवार सुट्टीचा दिवस असल्याचा फायदा उचलून यांत्रिक बोटीद्वारे चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. सातपाटीमधील मेरिटाईम बोर्डाचे कार्यालय हे सातपाटीच्या किनाºयालगत असताना त्यांच्या डोळ्यादेखत खाडीत रेती उत्खनन केले जात आहे. किनाºयालगत सातपाटी, मुरबे, खारेकुरण, दापोली गावांच्या दोन्ही बाजूस तिवरांच्या लांबलचक रांगा आहेत. असे असताना मुरबे, दापोली भागातील गावात असलेल्या फक्त रेती बंदरावरील जागेवरच तिवरांची झाडे नसल्याने संशय व्यक्त केला जात असून ही रेती बंदरे तिवरांच्या झाडांची कत्तल करून उभारण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तहसीलदार कार्यालयाकडेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेती उत्खननाला परवानगी देऊ नये, असे पत्र ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी अवैध रेती उत्खननाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कांदळवन संरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असून तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल जिल्ह्यात केली जात आहे. डहाणूचे उपवन संरक्षक विजय भिसे यांनी बोईसर आणि पालघरच्या वनपरिक्षेत्र अधिकाºयांना घटनास्थळी पाठवून सर्वेक्षण करून त्यांच्या अधिकार क्षेत्रातील जमिनीवरील तिवरांची कत्तल झाल्याबाबत गुगल मॅपवरील जुने छायाचित्र पाहिल्यास तिवरांच्या झाडांचे क्षेत्र कमी कमी होत असल्याचे दिसून येईल.