सेवानिवृत्त कर्नलचा मृत्यू कोरोनामुळे की हृदयविकाराने?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:23 AM2020-04-06T06:23:22+5:302020-04-06T06:23:26+5:30
मृतदेह ग्रामीण रुग्णालयातच, अहवालाची प्रतीक्षा
मनोर : दिल्लीवरून मुंबईला जाणारे एक सेवानिवृत्त कर्नल यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारासाठी शनिवारी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू कोरोनाच्या प्रादुर्भावाने झाला, की हृदयविकाराने हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रविवारीही त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला नाही.
दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांना ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच अंगात तापही होता. त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले की कोरोना आजाराने झाले हे मुंबईवरून अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातच बर्फाच्या पेटीत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉ. गावित आणि डॉ. हर्षवर्धन मोरे यांनी दिली.
वसईत ६५ वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह
वसई : वसई पश्चिम येथील ओमनगरमधील ६५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून, त्यांना नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे त्यांची पत्नी व मुलाला खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणासाठी ठेवले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.