सेवानिवृत्तांचा जि.प. कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: July 16, 2015 11:48 PM2015-07-16T23:48:01+5:302015-07-16T23:48:01+5:30
ठाणे जिल्हापरिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे कित्येक वर्षापासून प्रलंबित असून एप्रिल २०१५ पासून त्यांना मिळणारे निवृत्तीवेतनही
पालघर : ठाणे जिल्हापरिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे कित्येक वर्षापासून प्रलंबित असून एप्रिल २०१५ पासून त्यांना मिळणारे निवृत्तीवेतनही अनियमित तसेच दिरंगाईने मिळत आहे. त्यामुळे केवळ निवृत्तीवेतनावर अवलंबून असलेल्या तसेच अनेक व्याधींनी जर्जर असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा त्रास होतो. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो सेवानिवृत्तांनी गुरुवारी पालघर जिल्हापरिषद कार्यालयावर मोर्चा काढला.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २००९ च्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेस अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही हे वेतन त्यांना मिळत नाही. परिणामी, वयपरत्वे अनेक व्याधींनी त्यांना ग्रासल्यामुळे औषधोपचारासाठी जवळ पैसेच नसल्याने त्यांच्यापुढे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्याचप्रमाणे त्यांची गटविमा प्रकरणे २००२ पासून प्रलंबित असून वारसांना रक्कम मिळणे आवश्यक आहे.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्रदान केली असून जेष्ठता सूची तयार करून २० टक्के शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याची कामे २५ वर्षापासून प्रलंबित आहेत. तर ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या निवड वेतनश्रेणी आदेशात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, वसई, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, डहाणू, भिवंडी इ. तालुक्यांत शिक्षकांचा समावेश न करता अर्धवट ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली आहे. एप्रिल १५ नंतर व त्यापूर्वीही सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे मंजूर न झाल्याने त्यांना वेतन मिळत नाही. अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा इ. भागांतील शेकडो सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी पालघरच्या हुतात्मास्तंभावरून मोर्चा काढला होता.
पालघर जि.प. कार्यालयासमोर पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्या वेळी त्यांच्याशी चर्चा करण्यास कुणीही उपस्थित नसल्याने संतप्त वयोवृद्ध निवृत्ती कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संयमाने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना परावृत्त करण्यात यश मिळविले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विनायक शेळके, बापुराव देवकर, शालिनी गायकवाड, ज.ल. पाटील, मारुती वाघमारे इ. शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांची भेट घेतली.
या वेळी जि.प. ठाणे येथून अकाऊंट ट्रान्सफर प्रक्रियेला उशीर होत असल्याने व स्टाफ कमी असल्याने थोडा उशीर होत असल्याचे सांगून आॅगस्ट २०१५ पासून दरमहा १ तारखेला नियमित निवृत्तीवेतन अदा करण्याची लेखी हमी जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिले. (वार्ताहर)
१५ एप्रिलपासून वेतन अनियमित व दिरंगाईने मिळत आहे. मार्च २०१५ चे निवृत्तीवेतन २७ मे ला, एप्रिल १५ चे १२ जूनला तर मे २०१५ चे वेतन ९ जुलै रोजी मिळाले असून जून २०१५ चे निवृत्तीवेतन अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे केवळ निवृत्तीवेतनावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.