परतीच्या पावसामुळे वीट व्यवसायाचाही खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:12 AM2019-11-26T00:12:37+5:302019-11-26T00:13:14+5:30
परतीच्या पावसाने यंदा भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून उशीरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने जमिनीत ओलावा आहे.
वाडा/कासा : परतीच्या पावसाने यंदा भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून उशीरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने जमिनीत ओलावा आहे. या ओलाव्यामुळे अद्यापही वीट व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करता आलेला नाही. वास्तविक, दसरा झाल्यानंतर लगेचच वीट व्यावसायिक व्यवसायाला सुरवात करतात. मात्र यावर्षी जमिनीत ओलावा असल्याने व्यवसाय सुरू करता न आल्याने वीट व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत.
पालघर तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भातशेती हा मुख्य व्यवसाय काही वर्षांपासून तोट्यात चालला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असे चक्र अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दिवाळखोरीत सापडला आहे. या व्यवसायाला पूरक व्यवसाय (जोडधंदा) म्हणून काही शेतकरी आणि बेरोजगार तरूण वीट उत्पादन व्यवसाय करतात. मात्र निसर्ग तसेच सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे हा व्यवसायही दिवाळखोरीत जाण्याची चिन्हे आहेत. यावर्षी उशीरापर्यंत परतीचा पाऊस पडल्याने जमिनीत अद्यापही ओलावा आहे आणि या एकमेव कारणामुळे वीट उत्पादन सुरू केलेले नाही.
अनेक वीट उत्पादक वीट तयार करण्यासाठी लागणारे मजूर हे मे महिन्यातच त्यांना आगाऊ रक्कम देऊन फिक्स करतात. त्यानंतर गौरी- गणपती, दसरा दिवाळी या सणाबरोबरच कधी वेळ प्रसंगी गरज लागलीच तर पैसे आगाऊ देतात. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही वीट उत्पादन सुरू न केल्याने व्यावसायिकांना अद्यापही मजुरांना पैसे द्यावे लागत असून ते अडचणीत आले आहेत. दसरा - दिवाळीला धंदा सुरू केल्यानंतर आतापर्यंत लाखो नवीन विटा तयार झाल्या असत्या. मात्र पावसामुळे धंद्यासाठी उशीर होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील भिवंडीचे खारबाव, पाये, पायगाव, अनगाव, टेंबवली, अंबाडी, दाभाड, दिघाशी हा परिसर तर वाडा तालुक्यातील वसुरी, खानिवली, आंबिस्ते, केळठण, निंबवली, घोणसई, डोंगस्ते, देवघर, जाळे, कुयलू, कांबारा, खैरे येथे वीट उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हा व्यवसाय करणारे साधारण एक ते दोन हजार वीटउत्पादक व्यावसायिक असून ते वीस ते पंचवीस हजार कुटुंबे वीट तयार करण्यात गुंतलेली आहेत. विटांना ठाणे, मुंबई, कल्याण या शहरातून तसेच ग्रामीण भागातही औद्योगिककरणामुळे बांधकामे सुरू असल्याने चांगली मागणी आहे.
पावसामुळे साधारणपणे एक महिना उशिराने हा व्यवसाय सुरू होत आहे. या एका महिन्यात एक ते दीड लाख विटा तयार झाल्या असत्या. या उशीराचा फटका आम्हा सर्वच वीट व्यावसायिकांना बसला आहे.
- हेमंत पाटील, वीट उत्पादक व्यावसायिक
सिमेंट विटांमुळे मागणी कमी
सध्याच्या परिस्थितीत सिमेंटच्या विटांना बिल्डरकडून जास्त मागणी आहे. सिमेंटच्या विटांची लांबी रूंदी आणि उंची जास्त असते. तसेच त्यासाठी बांधकाम करताना सिमेंट रेती मजुरीचा खर्च कमी येतो. त्यामुळे सिमेंट विटांना जास्त मागणी आहे. मोठे बिल्डर सिमेंट काँक्रीटीकरणाच्या इमारती बांधत असल्याने विटांची त्यांना गरजच लागत नसल्याने मातीच्या विटांना कमी मागणी आहे.