परतीच्या पावसाचा भात-फुलशेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:15 AM2020-10-05T00:15:14+5:302020-10-05T00:15:17+5:30
वसई-विरारमध्ये सखल भागांत पाणी; भातपिकाला झोडपले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पारोळ : वसई-विरारमध्ये काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दाणादाण उडवल्यानंतर रविवारीही झालेल्या पावसाने एकच हाहाकार उडवला. शनिवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटांसह रिपरिप पाऊस सुरू होता. रविवारी सकाळीही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ग्रामीण भागातील भात व फुलशेतीला अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वसईत काही दिवसांपासून भातकापणीला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन असल्याने खाजगी वाहनाने तयार फुलमाल मुंबईत विकण्यासाठी जाणाºया शेतकºयांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यात परतीच्या पावसाने वसई पूर्वेतील तयार भातपिकाला झोडपून काढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहरी पर्जन्यामुळे दरवर्षी शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तयार भातपीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी शेतकºयांनी कापून ठेवलेले भातपीक भिजले आहे. भातपीक ओले झाले की ते सुकल्याशिवाय त्याचे भारे बांधता येत नाहीत. यात खूप वेळ जात असल्याने शेतकºयांसमोरील चिंता वाढली आहे.
दुसरीकडे नवरात्रौत्सव, दसरा, दीपावली सणानिमित्त फुलांना मोठी मागणी असल्यामुळे वसई पूर्व-पश्चिम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती करण्यात आली आहे. झेंडूची फुले, मोगरा, चाफा यासारख्या फुलांना अवकाळी पावसाचा फटका बसला
आहे. तसेच वसई पूर्व व पश्चिमला असलेल्या मिठागरांचेही पावसाने नुकसान झाले आहे.
आधीच लॉकडाऊन काळात मोठा आर्थिक फटका बसलेल्या मिठागर व्यावसायिक, शेतकरी यांना अवकाळी पावसाने फटका दिल्याने त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणींत वाढ झाली आहे. शनिवारी संध्याकाळी व रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भागात पाणी साचून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.