आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती, पूरबाधितांच्या पंचनाम्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:31 AM2019-08-12T01:31:26+5:302019-08-12T01:31:36+5:30
अनेक वर्षे वाडा तालुका विकासापासून वंचित असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाड्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना केली होती.
वाडा : अनेक वर्षे वाडा तालुका विकासापासून वंचित असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाड्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिका-यांनी तालुक्यासंदर्भातील सर्व अधिका-यांची बैठक घेऊन अधिका-यांना तालुक्याच्या विकासासंदर्भात सूचना करत कर्मचा-यांची झाडाझडती घेतली.
वाडा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच या अतिवृष्टीमुळे ज्या शाळांचे तसेच प्राथमिक आरोग्य विभागाचे नुकसान झाले आहे त्यांचे देखील तत्काळ पंचनामे करून आहवाल बनविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे विहिरींमधे गाळ गेल्याने पाणी अशुद्ध झाले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. यासाठी तत्काळ विहिरींमधील पाणी काढून त्या साफ करण्याच्या सूचना यावेळी डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या. पाण्याने जर रोगराई उद्भवल्यास तालुका आरोग्य अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील असे ठणकावले.
यावेळी ज्योती ठाकरे यांनी वाड्यातील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयलयाचा दर्जा मिळावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थित अधिकाºयांना या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून सूचना करत अधिकाºयांनी नुसत्या अर्जविनवण्या न करता त्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. वाडा कोलम या तांदळाला (जी.आय.) मानांकन मिळावे यासाठी तालुका कृषी कार्यालयातून कोणते प्रयत्न केले. यासंदर्भात कृषी अधिका-यांना प्रश्न विचारात त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच वाडा कोलम वाचविण्यासाठी गट शेतीला प्राधान्य देण्याची सूचनाही केल्या.
या वेळी आ. शांताराम मोरे, पालघर उपजिल्हाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, आदी उपस्थित होते.
प्लास्टिकचा वापर
बंद करण्याचे आदेश
याच बरोबर ग्रामपंचायतींचा आॅनलाईन सुविधांचा बोजवारा उडाला असून ही सुविधा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना करण्यात आली. वाडा शहरातील रस्त्याबाबत बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करावी करण्याचा सल्ला यावेळी केला. वाडा डंम्पिंग ग्राउंड प्रश्न उपस्थित करत त्यांनी घनकचºयावर तातडीने काम करण्याची गरज असून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आदेश दिले.