वसईची रद्द ‘लेडीज स्पेशल’ पूर्ववत करा; अन्यथा तीव्र आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:20 AM2018-11-05T02:20:40+5:302018-11-05T02:20:56+5:30
वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले.
वसई - वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले.
शनिवारी सकाळी वसई रोड स्थानकात ‘मी वसईकर’ अभियानाच्या वतीने शेकडो प्रवासी महिलांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन केले, यावेळी रद्द करण्यात आलेली महिला स्पेशल गाडी पुन्हा पूर्ववत न केल्यास समस्त महिला प्रवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. वसई हून सकाळच्या वेळी सुटणाऱ्या लेडीज स्पेशल मुळे वसई आणि नायगाव मधील महिलांचा प्रवास काहीसा सुखावह होत होता मात्र, रेल्वे च्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबर पासून ही लोकल वसई ऐवजी विरार हून सोडण्यात येत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यामुळे येथील महिला प्रवाशांना प्रवास करणे आणि नोकरीवर वेळेत पोहोचणे फार अडचणीचे होत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.त्यामुळे शेकडो प्रवासी महिलांतर्फे रेल्वे प्रशासनला गाडी पूर्ववत सुरु करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आल्याचे मी वसईकर अभियानाच्या संयोजकांनी सांगितले. महिला स्पेशल लोकल पुन्हा पूर्ववत न केल्यास समस्त प्रवासी महिला तीव्र आंदोलन करतील असा इशारा हि यावेळी वसई रोड स्टेशन मास्तरांना देण्यात आला.
सर्वेक्षण केले सदोष
करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये लोकलमध्ये ६ ते ७ टीसींनी किती महिला प्रवास करतात. बसलेल्या व उभ्या महिलांच्या नोंदी, प्रत्येक स्थानकावर चढ-उतरणाºया महिला प्रवाशांच्या नोंदी केल्या होत्या मात्र या नोंदींव्यतीरिक्त त्यांच्याकडून रेल्वे समस्या किंवा महिला लोकल विरारहून सोडण्यात आल्यास काय त्रास होईल याबाबत विचारणा झाली नाही.
आनंददायी व सुखकर प्रवास हा समस्त रेल्वे प्रवाशांचा हक्क आहे, व तो त्यांना उपलब्ध करून देणं हे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य तर वसईतून सकाळी सुटणारी ९ .५६ ची महिला विशेष गाडी रद्द केल्याने महिलांच्या भावना संतप्त व तीव्र आहेत. वसईकर महिलांना दिलासा देणारा निर्णय रेल्वेने पुन्हा घ्यावा, अन्यथा महिला प्रवाशांचे आंदोलन सुरु होईल व त्याची जबाबदारी आपली राहील
-मिलिंद खानोलकर
संयोजक ; मी वसईकर अभियान, वसई