नागरिकत्व कायद्याविरुद्ध रिक्षाचालकांचा ‘रास्ता रोको’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:39 PM2019-12-23T23:39:14+5:302019-12-23T23:39:24+5:30
भिवंडीत रिक्षा वाहतूक बंद : विद्यार्थी, नोकरदार यांचे झाले हाल; ठिकठिकाणी आंदोलने
भिवंडी : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करवून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन झाले आहे, असा आरोप करीत भिवंडी तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाने सोमवारी रिक्षांचा १२ तासांचा बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील १९ रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला होता. शहरातील आनंद दिघे चौक येथे दुपारी ३ वाजता काहीवेळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे भिवंडीतील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते.
सकाळी रिक्षाबंद आंदोलनामुळे शालेय विद्यार्थी, कामगार व नोकरदारवर्गाचे हाल झाले. मात्र, काही ठिकाणी रु ग्णांचे व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बंदमध्ये सहभाग न घेता रिक्षा रस्त्यावर उतरवून प्रवाशांना दिलासा दिला. त्यामुळे आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भिवंडीत काही दिवसांपासून विविध पक्ष व संघटनांमार्फत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी भिवंडीत तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाच्या वतीने आनंद दिघे चौकात ‘रस्ता रोको’ आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा कायदा रद्द करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली. देशामध्ये महागाई वाढत आहे. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे अनेक प्रश्न व समस्या असताना शासन मुक्याची भूमिका बजावत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाने विकासात्मक धोरण राबवण्याऐवजी धार्मिक तृष्टीकरण करून जनतेला वेठीस धरले आहे. असा आरोप रिक्षाचालक संघटनेने केला. संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी खालीद खान, कॉ. सुनील चव्हाण, अस्लम काबाडी, अय्युब शेख, अख्तर (बाबू) शेख, अनंता गुळवी, इद्रीस शेख आदींसह रिक्षाचालक सहभागी झाले.
भिवंडीत एमआयएमचा कॅण्डल मार्च
भिवंडी : केंद्र शासनाने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्यांविरोधात सोमवारी सायंकाळी ६ वाजता एमआयएमचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील कोटर गेट मशीद ते जुनी महापालिका कार्यालय असा कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. सुरुवातीला कोटर गेट मशीद ते धर्मवीर आनंद दिघे चौक असा हा मार्च निघणार होता. मात्र, त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, या कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर १७ जानेवारी सुनावणी होणार असल्याचे गुड्डू यांनी सांगितले.
मीरा रोडमध्ये समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम
मीरा रोड : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात शहरात आंदोलने सुरू आहेत. त्याला उत्तर म्हणून भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी शनिवारी रात्रीपासून या कायद्यांच्या समर्थनार्थ आंदोलन व सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मात्र भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेने थेट स्वत:च्या नावाने हे आंदोलन करणे टाळले आहे. तर, विरोध आणि समर्थनार्थ चालणाऱ्या आंदोलनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.