सावधान! वसई-विरारमध्ये पुन्हा वाढतोय कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:09 AM2020-11-21T00:09:59+5:302020-11-21T00:10:16+5:30
दिवाळीनंतर रुग्णांत पुन्हा वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सुरुवातीला हाताबाहेर गेलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला घट झाल्याने वसईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता दिवाळीनंतर कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सध्या फेरीवाले, विक्रेते सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरताना आढळत आहेत. त्यांच्याकडील वस्तू, पदार्थ विकत घेतले जाताना दिसून येत आहे. तसेच नागरिकदेखील कोरोनाच्या बाबतीत पुरेशी सुरक्षा न घेता विनामास्क इतरत्र भटकत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, आता दिवाळी सणानंतर अचानक कोरोना रुग्ण वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या २७ हजार ५९९ झालेला आहे. तर, या कोरोना आजारामुळे ८५० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आजारातून आजपावेतो २६ हजार २८० हून अधिक बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वसईतील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने खाली आल्याने
वसई-विरारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू होती. मात्र, बुधवारी व गुरुवारी रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाचे सावट अद्याप मानगुटीवर असताना नागरिकांनी सुरक्षेचे नियम न पाळता बेजबाबदारपणे वागण्यामुळे वसई-विरार परिसरामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका संभवतो.
नागरिकांची विनामास्क दिवाळी
दिवाळी सणामध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाने आवाहन करूनदेखील नागरिकांनी विनामास्क एकत्र येत दिवाळी साजरी केली. फटाक्यांवर बंदी असताना नागरिकांनी फटाके फोडले. यातून प्रदूषण झालेच, शिवाय फटाके फोडण्यासाठी नागरिक एकत्र आल्याचे दिसून आले. वसईतील मागील दोन दिवसांतील कोरोनावाढीचा वेग पाहता नागरिकांची बेपर्वाई पुन्हा कोरोनाची दुसरी लाट ओढवून घेण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालता येऊ शकतो, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.