वाडा तालुक्यातील रस्त्यांची चाळण
By admin | Published: June 2, 2016 01:14 AM2016-06-02T01:14:05+5:302016-06-02T01:14:05+5:30
तालुक्यात डी प्लस झोन जाहीर होऊन सन १९९२ पासून खेडोपाडी अनेक लहान मोठे उद्योग स्थिरावल्यानंतर तालुक्यातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे गेल्या
वाडा : तालुक्यात डी प्लस झोन जाहीर होऊन सन १९९२ पासून खेडोपाडी अनेक लहान मोठे उद्योग स्थिरावल्यानंतर तालुक्यातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे गेल्या २४ वर्षांत गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे जड वाहनांची वर्दळ असलेल्या अंतर्गत रस्त्याची चाळण होवून वाताहात झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालक वयोवृद्ध पादचारी त्यामुळे मेटाकुटीला आले आहेत.
३१ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली होती. परंतु हे फक्त दिवास्वप्न ठरले आहे. स्वातंत्र्यानंतर गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला मात्र आपले राज्यकर्ते या संदेशाचा दुसरा अर्थ म्हणजे खड्यातून चाला असा देत आहेत.
तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांपैकी विशेषत: कुडूस-चिंचघर ते विजयगड व चिंचघर- बुधावली ते देवघर गौरापूर या एकूण १५ कि. मी. लांबीच्या रस्त्यावर प्रत्येक दिवशी साधारण १४ हजार मेट्रिक टन वाहतूक होत असते तर कुडूस कोंढला खैरे आंबिवली आणि सापरोंडे - उचाट या एकूण १२ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर २० हजार मेट्रिक टन वाहतूक रोजची असते.
याचबरोबर मेट-घोणसई, डाकिवली-केळठण-निबंवली, या रस्त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. अशी प्रतिक्रिया प्रा. धनंजय पष्टे यांनी दिली आहे. योग्य क्षमतेचे मजबुतीकरण न झालेले आणि अगोदरच अरूंद असलेले रस्ते खड्डयामुळे धोकादायक बनले आहेत. खड्डयामुळे होणाऱ्या पाठदुखी, कंबरदुखी सारख्या विकाराने वाहनचालक हैराण झाले आहेत. तर , दुचाकीस्वार , महिला, वृध्द पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण हा कायद्याने हा गुन्हा आहे. संबंधित प्रशासना विरोधात जनहीत याचिकेच्या स्वरूपात फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. (वार्ताहर)