जव्हार तालुक्यातील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
By Admin | Published: February 15, 2017 11:26 PM2017-02-15T23:26:01+5:302017-02-15T23:26:01+5:30
या तालुक्यातील शिवाजीनगर ते कोगदा रस्त्याच्या डांबरीकारणाचे जि. प. बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे
जव्हार : या तालुक्यातील शिवाजीनगर ते कोगदा रस्त्याच्या डांबरीकारणाचे जि. प. बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आदिवासी युवा समितीने उघड केले आहे. ज्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या रस्याचे खोदकाम न करता त्या जुन्याच रस्त्यावर पातळ, खडीकरण करून व आॅइल मिक्स डांबर मारून काम केले जाते आहे. ज्या जुन्या रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. त्यावर डांबराचा फवारा न मारता पातळ खडी पसरवून डांबर टाकण्यात आले आहे.
तालुक्यात निकृष्ट बांधकामांमुळे रस्ता वर्षभरातच खराब होऊन त्यास खड्डे पडणे, रस्त्यावरील डांबरीकरण पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाणे असे प्रकार घडले आहेत. बांधकामातील हा भ्रष्ट्राचार आदिवासी संघर्ष समितीच्या तरुणांनी चव्हाट्यावर आणला असून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
आपल्या भागातील रस्ते व्यवस्थित व चांगले व्हावे या दृष्टीने हे तरुण डांबरीकरण रस्त्याच्या कामाकडे लक्ष घालून कामे करून घेणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
शिवाजीनगर येथे होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने या भागातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या डांबरीकरणाचा दर्जा सुधारला जावा यासाठी ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम कार्यालयावर धडक देणार आहेत. संबंधित जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी व त्यांचे ठेकेदार यांना निवेदन देऊन जाब विचारणार आहेत. जर कामात सुधारणा झाली नाही तर आंदोलनही करण्याचा इशारा त्यांनी लोकमतशी बोलतांना दिला आहे. (वार्ताहर)