कुडूस-कोंढला रस्ता मृत्यूचा सापळा
By admin | Published: August 8, 2015 09:44 PM2015-08-08T21:44:42+5:302015-08-08T21:44:42+5:30
येथील रहदारीचा प्रमुख रस्ता असलेल्या कुडूस-कोंढला या मार्गावर जून महिन्यापासून अनेक अपघात झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात उद्योग
वाडा : येथील रहदारीचा प्रमुख रस्ता असलेल्या कुडूस-कोंढला या मार्गावर जून महिन्यापासून अनेक अपघात झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात उद्योग असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होत असल्याने येथे नेहमी वाहनांची कोंडी होते. डागडुजीनंतर हा मार्ग लगेच उखडल्याने ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. १०) पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे.
कुडूस-कोंढला हा १० किमीचा रस्ता असून या रस्त्यासाठी शासनाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ४ कोटी ८३ लाख इतका निधी मंजूर केला होता. या रस्त्याचा ठेका गजानन कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला होता. ठेकेदाराने हे काम वाड्यातील एका पोटठेकेदाराला दिले होते. त्याने आॅक्टोबरनंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. काम निकृष्ट दर्जाचे केले. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते न झाल्याने त्याने पावसाळा सुरू होताच काम अपूर्णावस्थेतच सोडल्याने मातीभरावामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला आहे. मुख्य रहदारीच्या मार्गाची अशी दुरावस्था झाल्याने वाहने फसणे, दुचाकी घसरणे, सायकलस्वार पडणे अशा अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. या शिवाय वाहनांचे नुकसान सतत होत असते.
(वार्ताहर)