जव्हारमधील आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:58 PM2019-12-30T23:58:51+5:302019-12-30T23:58:55+5:30
ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे?
जव्हार : राज्यात युतीचे सरकार जाऊन आता महाविकास आघाडीचेसरकार आलेले आहे. सरकारे दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र राज्याची राजधानी मुंबईपासून अवघ्या दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जव्हार या आदिवासी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आजही जशीच्या तशी कायम आहे. त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
जव्हार भागातील गाव-पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मिळूनही रस्त्यांची दुर्दशा आजही कायम आहे. कुठल्याही सरकारकडून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे होत नसल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सरकार कुठलेही असुद्या आमच्या रस्त्यांची कामे होत नाही, अशीच समज ग्रामीण जनतेने करून घेतलेली आहे.
जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र या तालुक्याला जोडणाºया रस्त्यांची कामे व्यवस्थितरीत्या होत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. शासनाकडून ग्रामीण भागासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळत असतो. मात्र तालुक्यातील गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे कुठलेही सरकार असो, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. जव्हार ते मोखाडा नाशिक रस्ता, जव्हार ते वाडा विक्रमगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. तसेच ग्रामीण आदिवासी भागातील देहेरे-मेढा रस्ता, केळीचापाडा साकूर झाप रस्ता, जामसर विनवळ रस्ता हे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या खेड्यापाड्यांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र आजही जव्हार तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
बुजवलेले खड्डे वर्षभरातच उखडले
तालुक्यात काही ठिकाणी डांबरीकरण तसेच खड्डे बुजविण्याची कामे झालेली आहेत. परंतु डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे वाहनचालक व नागरिक वैतागले आहेत. उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. जव्हार तालुक्यात साकूर, नांदगाव, साखरशेत, जामसर अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा भार अधिक असून यामध्ये गरोदर मातांना जव्हार ग्रामीण रुग्णालयात पोहचवत असताना खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक गरोदर मातांना कुटीर रुग्णालयात पोहचवताना प्रसूती झाल्याचे प्रकार घडले आहेत. वाहन चालक वैतागले असून, मोटारसायकल चालकांना अपघात झालेले आहेत.