रस्ते सुरक्षा अभियान: पालघरमध्ये वर्षभरात खूपच घटले एसटी अपघातांचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:08 AM2021-01-29T01:08:40+5:302021-01-29T01:09:01+5:30
पालघर जिल्ह्यात एकूण ८७३ एसटी चालक असून १० वर्षे विनाअपघात बस चालविली म्हणून एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
हितेन नाईक
पालघर : सध्या राज्यात रस्ते सुरक्षा अभियान सुरू असून यादरम्यान सर्वसामान्यांचे वाहतुकीचे साधन असणारी एसटी किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरातील अपघातांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. चालक आणि वाहकांचे वेळोवेळी प्रबोधन केले जात असून, प्रशिक्षण केंद्रातून उजळणी प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधीक्षक आशिष चौधरी यांनी दिली.
पालघर एसटी परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ डेपो असून या डेपोंतून दररोज एसटी बसच्या ३ हजार ३७४ फेऱ्यांसह १ लाख ४३ हजार किलोमीटर्सचा प्रवास केला जातो. यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यामुळे जिल्हावासीयांसाठी एसटी फायदेशीर ठरली आहे, असेच म्हणता येईल. पालघर जिल्ह्यात एकूण ८७३ एसटी चालक असून १० वर्षे विनाअपघात बस चालविली म्हणून एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्यांची छाननी केल्यानंतर निश्चित संख्या ठरवून लवकरच सत्कार करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्कार थोड्या उशिराने होत आहे, असे सांगण्यात आले.
७०ला स्पीड लॉक
बसेसना ७०चे स्पीड लॉक आहे. तरीही अपघात होतच असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांना ७०चा स्पीड लॉक करण्यात आला असून, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका अपघातात एसटी चालकाचे नियंत्रण सुटून एका कारला धडक दिल्यानंतर कारमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची एकमेव गंभीर अपघाताची घटना घडली होती. त्याव्यतिरिक्त एसटीसमोर पादचारी अचानक येणे, मोटारसायकलने एसटीला समोरून धडक देणे, अशा काही घटनांत अपघात होत काही गंभीर तर काही किरकोळ घटना घडल्या आहेत.
पालघरमध्ये वर्षभरातील अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे. चालक आणि वाहकांचे वेळोवेळी प्रबोधन केले जात असून प्रशिक्षण केंद्रातून उजळणी प्रशिक्षण देण्यात येते. दुसरीकडे शिबिरातून आरोग्य तपासणीसोबतच डोळे तपासणी वेळोवेळी केली जाते. - आशिष चौधरी, विभागीय वाहतूक अधीक्षक