डहाणूूमधील रस्त्यांची कामे कासवगतीने! प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:15 AM2020-01-24T00:15:01+5:302020-01-24T00:15:06+5:30

डहाणू तालुक्यातील चिंचणी , वाणगाव, आशागड, जामशेत, बहारे येथील राज्यमार्ग असलेल्या रस्त्यांबाबतची कामे हायब्रीड अ‍ॅन्युइटी प्रोजेक्टअंतर्गत सुरू आहेत.

Road work in Dahanu works fast! Regardless of the administrative system? | डहाणूूमधील रस्त्यांची कामे कासवगतीने! प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष?

डहाणूूमधील रस्त्यांची कामे कासवगतीने! प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष?

Next

- शौकत शेख

डहाणू : डहाणू तालुक्यातील चिंचणी , वाणगाव, आशागड, जामशेत, बहारे येथील राज्यमार्ग असलेल्या रस्त्यांबाबतची कामे हायब्रीड अ‍ॅन्युइटी प्रोजेक्टअंतर्गत सुरू आहेत. मात्र, हे काम कासवगतीने सुरू असल्याचे दिसते, कारण गेल्या वर्षभरात या रस्त्यांचे २० टक्क्यांहूनही कमी काम झाले आहे. याशिवाय वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक रस्त्याचे कामही ठप्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प फोल ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ ठेकेदारांचा विकास व्हावा यासाठी हा शेकडो कोटींचा प्रकल्प सुरू केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या रस्त्यावरून प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नागरिकांना २०२१ ची वाट पाहावी लागेल, अशी सध्या कामांची अवस्था आहे.

या प्रकल्पाअंतर्गत डहाणू तालुक्यातील चिंचणी- आशागड - जामशेत - बहारे या ३४.५० किमी.च्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण करणे असा आराखडा आहे. या प्रकल्पासाठी १२० कोटींइतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ठेकेदारांनी थातूरमातूर काम करूनही टेंडर रकमेपैकी पहिला मोठा हप्ता ठेकेदारांना दिला आहे. याचा कार्यादेश मे. जी. एच. व्ही. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गुजरात या कंपनीला गेल्या वर्षी देण्यात आला. नियमानुसार हे काम दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. असे असतानाही या एकूण प्रकल्पापैकी २० टक्केच काम आजवर पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

ठेकेदारावर प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही दबाव दिसून येत नाही. विशेष म्हणजे, या कामाच्या देखरेखीसाठी ठाण्यातील टेक्नोजेम कन्सल्टंट प्रा.लि. या संस्थेला स्वतंत्र सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. पण ही सल्लागार संस्थाही कामाच्या ठिकाणी हवे तसे काम करत असेल, असे कामाच्या टक्केवारीवरून वाटत नाही. डहाणू तालुक्यातील चिंचणी, वाणगाव, आशागड, जामशेत, आंबेसरी, धुंदलवाडी, बहारे या रस्त्यावर हा प्रकल्प राबवला जात आहे. वारंवार खराब होणारे रस्ते, वाहतुकीला अडचण निर्माण करणारे रस्ते, रहदारीचे रस्ते अशी ठिकाणे लक्षात घेऊन ठेकेदाराने ते प्राधान्यक्रमाने बनवणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. चिंचणी - वाणगाव - आंबेसरी - उधवा या रस्त्यावर काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी रस्ता रुंदीकरण करण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर विजेचे खांब, झाडे अजूनही काढण्यात आली नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच आंबेसरी - बारीपाडा येथे रस्त्यावर मोरी तसेच साकवाचे काम वगळता इतर कोणत्याही ठिकाणी मोऱ्यांचे काम केलेले नाही. जेथे ठेकेदारामार्फत सध्या काम सुरू आहे, तेथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

काय आहे हायब्रीड अ‍ॅन्यूईटी योजना?: बांधकाम कालावधी दोन वर्षे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाºया रस्त्यांपैकी काही किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारण्यासाठी राज्य शासनाने ही योजना अंमलात आणली. यात प्रत्यक्ष बांधकामाचा कालावधी दोन वर्षे आहे. ही योजना शासन आणि खासगी भागधारक यांनी एकत्रितरीत्या राबवायची आहे. यामध्ये शासनाचा ६० आणि खासगी ४० टक्के असा सहभाग राहणार आहे. या अंतर्गत बांधण्यात येणाºया रस्त्यांची दहा वर्षे देखभाल-दुरुस्ती ठेकेदारांमार्फत करावयाची आहे.

तांत्रिक अडचणी आल्याने काम थांबले होते, मात्र आता सुरू आहे. या प्रकल्पावर पूर्णपणे शासकीय नियंत्रण असून काम करून घेण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील. ठेकेदाराला दिशादर्शक फलक बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-विवेक बडे, कार्यकारी अभियंता

या प्रकल्पांतर्गत रस्ते विकास योजनेत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचित करू.
- राजेंद्र गावित, खासदार, पालघर

डहाणू तालुक्यातील या प्रकल्पात समाविष्ट रस्त्याच्या कामात कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही. हा रस्ता ग्रामीण भागातील विकासासाठी महत्वाचा ठरणार असल्याने त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
-विनोद निकोले, आमदार, डहाणू

Web Title: Road work in Dahanu works fast! Regardless of the administrative system?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर