काेराेनाला राेखण्यासाठी ‘नाकेबंदी’, रेल्वेस्थानक, नाक्यांवर पाेलीस, आराेग्य पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:56 AM2020-11-26T01:56:34+5:302020-11-26T01:57:09+5:30
जिल्हा प्रशासनाच्या कडक उपाययाेजना : रेल्वेस्थानक, नाक्यांवर पाेलीस, आराेग्य पथके
हितेन नाईक/सुरेश काटे
पालघर/तलासरी : जिल्ह्यात कोरोनाला प्रवेशबंदीसाठी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कडक उपाययोजना आखल्या आहेत. महत्त्वपूर्ण चार रेल्वेस्थानके, चेकपोस्ट आणि आच्छाड तपासणीनाक्यावर आरोग्य आणि पोलीस विभागाची पथके तैनात केली आहेत. प्रवाशांची कडक तपासणी करून कुठलीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच पुढच्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला जाणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना स्वखर्चाने नजीकच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करून घ्यावे लागणार आहेत. सर्वत्र सकाळी ९ पासून तपासणी मोहीम सुरू झाल्याने वाहनांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनामार्फत नवीन कार्यप्रणाली जाहीर केल्याने पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद या राज्य महामार्गावरून दिल्ली, राजस्थान, गुजरात, सिल्वासा येथून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीसाठी तलासरी येथील आच्छाड तपासणीनाक्यावर आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची १२ पथके तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे परराज्यांतून लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीसाठी डहाणू, बोईसर, पालघर आणि वसई या रेल्वेस्थानकांवर स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. जिल्ह्यात एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर प्रवाशांना आरटीपीसीआर अहवाल (कोविड-१९ चाचणीचा) हा ९६ तासांपूर्वी घेतलेला असावा, असे बंधनकारक केले आहे. ज्यांच्याकडे चाचणी अहवाल नसेल, त्यांची थर्मल गन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करताना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची ॲण्टीजेन चाचणी केली जाणार आहे. ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तर पुढचा प्रवास करता येईल.
तीन नाेडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
जिल्ह्यात तीन नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. डहाणू तालुक्यासाठी सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पालघरसाठी उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर, तर वसईसाठी स्वप्नील तांगडे यांची नियुक्ती केलेली आहे. डहाणू स्थानकात लांब पल्ल्यांच्या सात एक्स्प्रेस ट्रेनना थांबा असून त्यातून उतरणाऱ्या प्रवाशांच्या तपासणी व इतर बाबींकडे लक्ष पुरवण्याची जबाबदारी डहाणू नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सोहम गुरव यांना तर, बोईसर स्थानकावर चार एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी पालघरचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, पालघर स्थानकावर दाेन एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्वाती देशपांडे आणि वसई येथे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.