वसई-विरार पालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांत; प्रशासन घेणार नागरिकांचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:28 AM2020-08-28T00:28:51+5:302020-08-28T00:29:04+5:30

प्रशासन ढिम्म : जीवितहानीची भीती

Roads in Vasai-Virar municipal area in potholes; Will the administration take the victim of the citizens? | वसई-विरार पालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांत; प्रशासन घेणार नागरिकांचा बळी?

वसई-विरार पालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांत; प्रशासन घेणार नागरिकांचा बळी?

googlenewsNext

विरार : यंदाच्या लॉकडाऊन काळात नागरिक जितके कोरोना आपत्तीमुळे कंटाळलेले आहेत, त्याहून जास्त आता ते वसईतील मुख्य रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांना वैतागले आहेत. वाहने चालवणाऱ्या चालकांना तर वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाच्या अतिप्रमाणामुळे वसई शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

अनेक रस्त्यांत मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना नुकसान होऊ लागले आहे. वाहनातून प्रवास करणाºया नागरिकांनाही रस्त्यांतील खड्ड्यांमुळे वेदनादायी प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते. रस्त्यांची अवस्था पाहता वसईतील मुख्य रस्तेच खड्ड्यात गेल्याचे दिसून येते.

लॉकडाऊन काळात उपासमारीच्या कळा सोसणाºया नागरिकांनी आता महापालिका प्रशासनाला रस्त्यांतील खड्ड्यांवरून टीकेचे धनी केले आहे. पालिका हद्दीत फोफावत असलेल्या कोरोना प्रादुर्भावावर महापालिकेला नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे तर आता नागरिकांना रस्त्यांतील खड्ड्यांची डोकेदुखी भेडसावू लागली आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता वसईतील जे रस्ते खड्डेमय झाले आहेत ते तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
श्री गणरायांच्या आगमनानिमित्त वसईतील खड्डे बुजवण्याचे साधे कष्ट महापालिका प्रशासनाकडून घेतले गेले नाहीत. रस्त्यात पडलेले खड्डे इतके खोलगट झालेत की रात्रीच्या वेळी किंवा दिवसादेखील दुचाकी वाहनचालक त्यात आपटून गंभीररीत्या जखमी होण्याचा धोका संभवतो. वसई पूर्वेतील एव्हरशाईन गेट व पुढे नवजीवन परिसरात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात नागरिकांनी लाकडाच्या पाट्या लावून वाहनचालकांना अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे.

पालिका प्रशासनाला मात्र अद्याप जाग आली नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गणरायांचे आगम खड्डेमय रस्त्यांत झाल्यानंतर आता रोजच्या वाहतुकीवर खड्ड्यांचे विघ्न उभे ठाकले आहे. मध्यंतरी महापालिका प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु खड्ड्यांत बारीक रिटपावडर, बारीक खडी, दगड भरून लेप देण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांत भरलेली बारीक खडी रस्त्यावर इतस्तत: विखुरली आहे. विखुरलेल्या बारीक खडीमुळे दुचाकीचालक घसरून पडण्याची शक्यता आहे. अपघाताचा धोका असताना महापालिका प्रशासनाने हातावर हात ठेवून स्वस्थ बसू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वसई पूर्वेतील एव्हरशाइन सिटी, रेंजनाका, चिंचपाडा, गोलानी, वालीव, नवजीवन, वसईफाटा या परिसरात मुख्य रस्त्यांत मोठमोठे हातभर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत रोज वाहने आदळतात. दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा सर्वाधिक धोका आहे. खड्ड्यात आपटून दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होऊ शकतो. यात वाहनचालक गंभीररीत्या जखमी होऊ शकतो.

 

Web Title: Roads in Vasai-Virar municipal area in potholes; Will the administration take the victim of the citizens?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे