संततधारेसह समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 11:59 PM2020-07-05T23:59:10+5:302020-07-06T00:00:03+5:30
किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले.
- हितेन नाईक
पालघर : मुसळधार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या समुद्राच्या लाटांनी रविवारी दुपारी रौद्ररूप धारण केले होते. किमान चार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्याने समुद्रकिनारी राहणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले.
सन २००२ मध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने सातपाटीच्या पश्चिमेस बांधलेल्या बंधाºयाला भगदाड पडल्याने पावसाळ्यात निर्माण होणाºया महाकाय लाटांचे पाणी बंधाºयाला पार करून गावात शिरू लागले होते. त्यामुळे बंधाºयालगतच्या अनेक घरांची पडझड होत घरातील जीवनावश्यक वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस होण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे मच्छीमार सहकारी संस्था, सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यांना यश येत पतन विभागाने नव्याने सुमारे ९०० मीटर्सच्या बंधारा उभारणीला परवानगी दिली होती.
मागील वर्षभरापासून सुरू असलेले हे काम मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद पडले होते. परंतु जुलै महिन्यापासून समुद्र खवळलेला राहून महाकाय लाटा गावात शिरल्यास किनाºयावरील घरांना निर्माण होणारा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बाब म्हणून बंधाºयाच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. या धूप प्रतिबंधक बंधाºयाच्या कामाचे ठेकेदार वसंत चव्हाण यांनी युद्धपातळीवर बंधाºयाच्या कामाला सुरुवात करीत गावात समुद्राचे पाणी शिरण्याची भगदाडे बुजवून ५७५ मीटर्सचे काम जवळपास पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या बंधाºयाची उंची वाढविण्यात आल्याने समुद्राच्या लाटा आता थोपवून धरल्या जात असून समुद्राच्या वाढत्या उधाणाच्या महाकाय लाटांमुळे होणाºया वित्तहानीच्या घटना घडण्याची शक्यता धूसर बनली आहे. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाºयामुळे ४ ते ५ मीटर्सच्या लाटा निर्माण होत त्यांनी बंधारा पार केला असला तरी मच्छीमारांच्या घरात पाणी शिरून नुकसानीच्या घटना मात्र घडल्याचे दिसून आले नाही.
कामगारवर्गात कोरोनाची भीती : सातपाटी येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने बंधाराउभारणीच्या कामासाठी उपलब्ध कामगारवर्ग सध्या संसर्ग होण्याच्या भीतीने कामावर येत नसल्याने ठेकेदारासमोर पेच निर्माण झाला आहे. या बंधाºयाचे उर्वरित काम येत्या महिनाभरात संपवून टाकण्याचे लक्ष्य आपण ठेवल्याचे चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही मच्छीमारांचे कुठलेही नुकसान होऊ नये, यासाठी जीवाची पराकाष्ठा करीत असताना या बंधाºयाच्या कामापोटी शासनपातळीवरून बिले निघत नसल्याने शासनाने आमचा सकारात्मक विचार करावा, असेही शेवटी त्यांनी सांगितले.