जुचंद्रतील मुथूट फायनान्सवरील दरोड्याचा प्रयत्न फसला; दोन दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:28 AM2020-02-07T03:28:31+5:302020-02-07T03:28:36+5:30

गडफेकीत दोन पोलीस जखमी, वालीव पोलिसांत गुन्हा दाखल \

Robbery attempt at Muthoot Finance in Zuchandra fails; Two robbers arrested | जुचंद्रतील मुथूट फायनान्सवरील दरोड्याचा प्रयत्न फसला; दोन दरोडेखोरांना अटक

जुचंद्रतील मुथूट फायनान्सवरील दरोड्याचा प्रयत्न फसला; दोन दरोडेखोरांना अटक

googlenewsNext

पारोळ/नालासोपारा : नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील मुथूट फायनान्स शाखेवरील दरोड्याचा धाडसी प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. यावेळी दरोडेखोरांकडून झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले असून दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या शाखेत सुमारे अडीच कोटींचे सोने असल्याचे समजते. वालीव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गाव हद्दीत मुख्य रस्त्यालगत बँक आॅफ इंडियाच्या बाजूला मुथूट फायनान्स (सोने तारण) शाखा आहे. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काही दरोडेखोरांनी या शाखेच्या पाठीमागे असलेले ग्रील तोडून भिंतीला अंदाजे दीड फूट होल पाडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्ट्राँगरुममध्ये असलेली तिजोरी फोडत असताना सायरन वाजला. शाखा मॅनेजर जगदीश हराड यांच्या मोबाइलवर याचा अ‍ॅलर्ट गेल्याने त्यांनी तात्काळ वालीव पोलिसांना याबाबत माहिती दिली.

वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बापाणे चौकीतील पोलिसांना खबर दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे समजताच दरोडेखोरांनी भिंतीला भगदाड पाडताना आत पडलेल्या विटा त्यांच्या अंगावर फेकल्या. यात पोलीस नाईक संभाजी पालवे यांच्या डोक्यात तर प्रदीप कुंभारे यांच्या तोंडावर वीट लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनीही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह धाव घेतल्याने दोन चोरटे हाताशी लागले. पण या चोरांचा म्होरक्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.याच गडबडीत एक दरोडेखोर या भगदाडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसºया दरोडेखोराला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

सहा महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे दरोडेखोरांनी येथेच दरोड्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हाही सायरन वाजल्याने त्यांचा डाव फसला होता. घटनेची माहिती मिळताच वसईचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपअधीक्षक डॉ. अश्विनी पाटील, वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलासचौगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

या कार्यालयात कोणतीही सुरक्षा किंवा साधा सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता. दोन पोलीस जखमी झाले असून, दोन चोरट्यांना हत्यारांसह पकडले आहे.

- विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)

Web Title: Robbery attempt at Muthoot Finance in Zuchandra fails; Two robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.