नालासाेपाऱ्यात पाेलिसांचा रूट मार्च, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 12:36 AM2021-02-14T00:36:02+5:302021-02-14T00:36:21+5:30
nalasopara : वसईच्या सातही पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाणे, रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ या तिन्ही पोलीस दलांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च काढण्यात येणार आहे.
नालासोपारा : आगामी वसई- विरार शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा- भाईंदर- वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वसईच्या सातही पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाणे, रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ या तिन्ही पोलीस दलांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी रूट मार्च काढण्यात आला.
आगामी दोन ते तीन दिवस सर्वत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मार्च काढण्यात येणार असल्याचे कळते. आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नालासोपारा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ व पोलीस ठाणे नेमणुकीतील अधिकारी,अंमलदारासह शुक्रवारी सकाळी ११ ते १२.३० दरम्यान हा मार्च काढण्यात आला.
हा मार्च नालासोपारा पोलीस ठाणे- समेळपाडा नाका- हेगडेवार चौक- बुरहान चौक- वाजा मोहल्ला- हड्डी मैदान- टाकीपाडा- धनंजय नकामार्गे छेडा नाका- मैत्री अपार्टमेंट- हनुमाननगर- एसटी डेपो रोड येथे समाप्त करण्यात आला.
शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
या रूट मार्चमुळे एकूणच नालासोपारा शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रूट मार्चमध्ये नालासोपाऱ्याचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस ठाण्यातील ६ अधिकारी व २१ अंमलदार, रॅपिड ॲक्शन फोर्सचे १ अधिकारी आणि ६० अंमलदार आणि एसआरपीएफचे १ अधिकारी आणि २० अंमलदार सहभागी झाले होते.