भार्इंदर पालिकेवर आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:03 AM2018-04-27T03:03:56+5:302018-04-27T03:03:56+5:30
रिपाइं आक्रमक : झोपड्यांवरील कारवाईचा केला निषेध
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी काजूपाडा परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामे व झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई बेकायदा असून सरकारी नियमानुसार त्यातील झोपड्या कायदेशीर असल्याचा दावा करत पालिकेने या मागणीसह इतर मागण्यांसाठी रिपाइंने जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर बुधवारी आक्रोश मोर्चा काढला.
या मोर्चात रिपाइं युवक आघाडी, हॉकर्स युनियन, रिक्षाचालक-मालक युनियन, चर्मकार युनियन, कामगार युनियन, महिला आघाडीच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. पालिकेने काजूपाडा येथील बांधकामांवर कुणाच्या तरी तक्रारीवरून त्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्यातील झोपड्या बेकायदा ठरवून केलेली कारवाईच बेकायदा असल्याचा दावा शेलेकर यांनी केला. या झोपड्या २०११ व २०१५ पूर्वीच्या असून राज्य सरकारने २०१५ पर्यंतच्या सर्व बांधकामांना अधिकृत ठरवले आहे. असे असतानाही बिल्डर लॉबीला खूश करण्यासाठी गरिबांच्या झोपड्या कुणाच्या तरी दबावाखाली पालिकेने तोडल्या. मात्र, या कारवाईतून पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांनी बांधलेली बेकायदा घरे व व्यावसायिक गाळ्यांना वगळल्याचा आरोप करण्यात आला. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप शेलेकर यांनी केला.
या कारवाईमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले असून त्याला केवळ प्रशासनच जबाबदार असल्याने यापुढे प्रशासनाने २०१५ पर्यंतच्या झोपड्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी केली. बीएसयूपी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन वर्षांत पक्की घरे देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र, पाच वर्षांपासून त्यांना पुरेशा सुविधा नसलेल्या घोडबंदर येथील संक्रमण शिबिरातच अद्याप ताटकळत ठेवले आहे.