वसईतील युवक पतसंस्थेत साडेआठ कोटींचा गैरव्यवहार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:47 AM2018-04-08T01:47:06+5:302018-04-08T01:47:06+5:30
वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई : वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील बारा वर्षांपासून तत्कालीन व्यवस्थापकासह दोन व्यवस्थापक, दोन कर्मचारी आणि एक शिपाई यांनी हा घोटाळा केल्याचे उजेडात आले होते. व्यवस्थापनाने सहाही जणांना सात महिन्यांपूर्वी बडतर्फ करून चौकशी सुुरु केली होती. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सूरज ठाकूर, लिपीक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी यांच्याविरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपींनी गेल्या बारा वर्षांपासून पतसंस्थेच्या आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना, निवृत्ती ठेव योजना व तारण सोने कर्जात घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. आरोपींनी बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढून विविध ठेवींमध्ये फेरफार करून पैसे हडपले.
इतकेच नाही तर तारण कर्जामधील सोने परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या रकमाही हडप केल्या. तसेच लेखा पुस्तक व दस्तऐवजांमध्ये खोट्या नोंदी घेऊन खोटे हिशोब सादर करून तब्बल ८ कोटी ५६ हजार १९हजार ७३२ रुपये हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे भागधारक प्रफुल्ल ठाकूर आणि अतुल पाटील यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणून तक्रारी केल्या होत्या.