आरटीआय कार्यकर्त्यांची चौकशी? पोलिसांचे स्वतंत्र पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:14 AM2018-04-03T06:14:08+5:302018-04-03T06:14:08+5:30
वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे.
वसई - वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने महापालिकेकडून माहिती अधिकारात अर्ज केलेल्यांची माहिती मिळवली आहे.
माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी शनिवारपासून वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे. खंडणी घेतल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी माहिती अधिकाराचीच सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जांची माहिती मिळवली आहे. अर्जदाराने किती आणि कोणाविरोधात माहिती मागवली. तक्रार केल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली याची माहिती पोलीस घेत आहेत. यात ज्यांच्याविरोधात अर्ज दाखल झालेत त्या संबंधित बिल्डरांकडून खंडणीची मागणी केली गेली काय. यांची चौकशी होणार आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दाखवाच...मनसेचे पोलिसांना आव्हान
आरटीआयखाली माहिती मागवलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून दाखवावेच, असे आव्हान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत पत्रकार परिषदेत बोलताना पोलिसांना दिले. मनसेच्या एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला तर वरती राज ठाकरे बसलेले आहेत. ते काय आहेत हे इथल्या नेत्यांना माहितीच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, पोलीस आणि संबंधित विभागाची आहे. अनधिकृत बांधकामे होण्यापूर्वीच ती रोखली पाहिजेत. पण, यात त्यांचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. कारवाई का नाही केली. यासाठी अनधिकृत बांधकाम झालेल्या विभागातील महापालिका अधिकारी आणि पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या मालमत्तेचेही चौकशी झाली पाहिजे अशी मनसेची प्रमुख मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.