वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली! प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव : बाजारांत सामाजिक अंतराचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 09:58 AM2021-05-12T09:58:30+5:302021-05-12T10:04:51+5:30
कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात.
विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात दररोज मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली व खुद्द वसई-विरार महापालिकेकडूनही नियोजनाचा अभाव असल्याने कोविड-१९ च्या संक्रमणाचे सावट कायम आहे.
कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात. बहुतांश ठिकाणी तर भाजी विक्री व्यावसायिक प्रचंड प्रमाणात वाढलेले निदर्शनास येत आहेत. परिणामी भाजी बाजारात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विशेष म्हणजे पालिकेने या भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे म्हणून मार्किंग करून त्याच जागेत बसण्याकरिता बजावलेले असतानाही या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, तर ग्राहकांचीही फेरीवाल्यांच्या गाड्यांसभोवती खरेदीसाठी गर्दी उसळत असतानाही यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. विशेष म्हणजे याविरोधात पालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही, तर काही वेळा या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेऊन पालिका कर्मचारीच या फेरीवाल्यांना मुख्य मार्गावरून उठवून गल्लीबोळात व्यवसाय करण्याची मुभा देत आहेत. याचे परिणाम म्हणून अनेक ठिकाणी मर्यादित वेळेनंतरही काही दुकाने पुढून बंद असली तरी मागून सुरू असताना दिसतात. अशा कित्येक दुकानदारांची पाहणी करून मग पोलीसही वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोविड-१९ संक्रमणाला रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे..
नागरिकांची भटकंती
सध्या प्रामाणिकपणे घरी बसून सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांची नाहक कोंडी झाली आहे. आपण किती दिवस घरी बसून राहायचे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सोबतच कारणाशिवाय फिरणाऱ्या व्यक्तींची धरपकड करून पोलीस त्यांची अँटिजन टेस्ट करत असले तरी कडक नियमावली नसल्याने बेफिकीर नागरिकांच्या भटकंतीत कमी आलेली नाही.