महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बांगलादेशी असल्याच्या अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:11 AM2019-12-19T00:11:23+5:302019-12-19T00:11:26+5:30

खोटी बातमी व्हायरल : सोशल मीडियावरील बातमीमुळे गोंधळ

Rumors that a priest in the Mahalaxmi temple is Bangladeshi | महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बांगलादेशी असल्याच्या अफवा

महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बांगलादेशी असल्याच्या अफवा

Next

कासा : डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिरात बांगलादेशी पुजारी अशा आशयाची खोटी बातमी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे भाविकांना सतत उत्तरे देत येथील विश्वस्त मंडळ व कर्मचारी त्रस्त झाले आहेत.


‘तालुक्यातील मुंबई - अहमदाबाद महामार्गालगतच्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात बांगलादेशी पुजारी असून त्यास पासपोर्ट नसल्याने पोलिसांनी अटक केली’, अशा आशयाची बातमी चार ते पाच वर्षांपूर्वी देखील व्हायरल करण्यात आली होती. आताही तोच प्रकार पुन्हा झाला असून त्यामुळे परिसरातील नागरिक व भाविक वारंवार मंदीर कार्यालय आणि विश्वस्त मंडळाला विचारणा करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महालक्ष्मी देवीचे पुरातन मंदिर खाली आहे. तसेच डोंगरावरही देवीचे मूळ स्थान आहे. काही दानशूर भक्तांनी २० वर्षापूर्वी तिथे डोंगरावर मंदिर उभारले आणि तेथे जाण्यासाठी पायऱ्या केल्या. संबंधित बांधकाम सुरू असताना तेव्हा बाबू रझाक मंडळ ही बांगलादेशी व्यक्ती मुकादम म्हणून तेथे काम करत होती. दोन वर्षांनी काम पूर्ण झाल्यावर पुढे तिथे उदरनिर्वाहासाठी एक थंडपेय दुकान टाकून तो राहू लागला. सध्या तिथे गडावर बोलाडा तर खाली मंदिरात सातवी कुटुंबातील पुजारी आहेत. हे दोन्हीही पुजारी आदिवासी समाजातील आहेत. बाबू मंडळ हे पुजारी नसून गडावरील मंदिरात दुकानदार आहेत. परंतु, सोशल मीडियावर महामार्गालगतच्या पुरातन मंदिराचे फोटो टाकून तिथे ते पुजारी असल्याची चुकीची बातमी व्हायरल केली जात आहे.


दरम्यान, पाच वर्षांपूर्वी बाबू मंडळ हे पुन्हा बांगलादेशात जाण्याच्या उद्देशाने पासपोर्टसाठी लागणारा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना चुकीचे पेपर असल्याने २५ सप्टेंबर २०१३ रोजी पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्यांना शिक्षा झाली आणि बाहेर जाण्यास बंदी घातली. शिक्षा भोगत असताना जामिनावर ६ महिन्यांनी बाहेर आल्याची माहिती मिळते. मात्र, सोशल मीडियावर मंदिरात पुजारी बांगलादेशी अशी बातमी फिरत आल्याने भाविक तसेच नागरिकांत गोंधळ निर्माण होतो आहे.


महालक्ष्मी मंदिरात दोन्हीकडील पुजारी हे आदिवासी समाजाचे आहेत. कोणीही बांगलादेशी पुजारी नाही. मात्र तसे असल्याची बातमी ही खोटी आहे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष,
श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे

Web Title: Rumors that a priest in the Mahalaxmi temple is Bangladeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.