मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ‘बर्निंग कार’चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:28 PM2021-07-04T12:28:47+5:302021-07-04T12:29:05+5:30
ससून नवघर येथील रात्रीच्या वेळची घटना; नशीब बलवत्तर, जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : मुंबईहुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकी गाडीला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास वसई जवळील ससूननवघर गावाच्या ठिकाणी घडली आहे.
नशीब बलवत्तर म्हणून तात्काळ गावकरी व इतर वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली किंबहुना या घटनेत सुदैवाने गाडीतील लोकं बचावले असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी रात्री 11 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या इंजिनांतून धूर येऊ लागला व क्षणात या गाडीच्या बोनेटने पेट घेतला आणि पाहता पाहता यातून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या गाडीचालकाने गाडी महामार्गावरील ससून नवघर गावच्या ठिकाणी गाडी उभी केल्यावर तिथे गावकरी व इतर वाहनचालकांच्या मदतीने गाडीतील लोकांना बाहेर काढले व त्यानंतर गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले.
दरम्यान वेळीच गाडीचालकाने व गावकरी व इतर वाहनचालकांनी मदतकार्य केल्यानं मोठी दुर्घटना टळली तर या घटनेत गाडीचे खूप मोठं नुकसान झाले असून गाडी जळून खाक झाली आहे मात्र कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळते आहे.