रूपेश जाधव यांचा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 02:49 AM2017-12-24T02:49:36+5:302017-12-24T02:49:55+5:30
या महानगराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करतांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत दलित आणि ख्रिस्ती मतांची बेगमी करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित नगरसेवकांना धक्का देऊन महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्रीक्स यांची निवड केली.
- शशी करपे
वसई : या महानगराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करतांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत दलित आणि ख्रिस्ती मतांची बेगमी करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित नगरसेवकांना धक्का देऊन महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्रीक्स यांची निवड केली.
वसई विरार महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या २८ डिसेंबरला आहे. यासाठी हिेतेंद्र ठाकूर कुणाची निवड करतील याकडे सगळ््यांचे लक्ष होते. त्यांनी नेहमीप्रमाणे मर्जीतील नगरसेवकांची निवड केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्र्ीक्स यांनी अर्ज भरले. दोनच अर्ज दाखल झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड निश्चित असून २८ डिसेंबरला त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
यांचा पत्ता कट
बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान उपमहापौर उमेश नाईक यांनी नालासोपारा नगराध्यक्षपदासह नगरसेवक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. सध्या ज्येष्ठ असलेल्या नाईक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना उपमहापौरपदावरूनही पाय उतार करण्यात आले आहे.
गेली सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत असलेले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांना यावेळीही डावलण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक नितीन राऊत, सुदेश चौधरी, भारती देशमुख यांच्याही नावाची चर्चा होती.